नागपूर : कोरोना संक्रमण कमी होत असल्याने रेल्वेगाड्यांची संख्या वाढत असल्याने रेल्वेच्या तिकिटांची दलाली करणारे सक्रिय होत आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरपीएफच्या टीमने कारवाई करीत ६ शहरांमध्ये २९ दुकानांची तपासणी केली. यात ११ दुकानांमध्ये अवैध रेल्वे तिकीट दलाली करताना आढळून आले. या प्रकरणी १२ आरोपींना अटक करण्यात आली.
१५ जून रोजी आरपीेएफचे मंडळ सुरक्षा आयुक्त पंकच चुघ यांच्या निर्देशानुसार व एएससी एस.डी. देशपांडे यांच्या मार्गदर्शनात मंडळ स्तरावर विशेष अभियान राबविण्यात आले. आरपीएफने आपल्या क्षेत्रातील २९ दुकानांची तपासणी केली. यात मोतीबागमध्ये २, इतवारीत १ यासह भंडारा गोंदिया, राजनांदगाव, छिंदवाडामध्ये प्रत्येकी १ व नागपूरमध्ये ३ अशा ११ दुकानांमध्ये अवैध रेल्वे आरक्षित ई-तिकिटांचा कारभार सुरू असताना आढळला. या प्रकरणी आरोपींविरुद्ध रेल्वे अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या प्रकरणी पाच एजंटचे आयडी जप्त करण्यात आले. २९ लाईव्ह प्रवास तिकीट व ९३ जुन्या तिकीट ज्यांची किंमत १ लाख १६ हजार ३७८ रुपये असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर अवैध तिकीट बनविण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले.