नागपूर : पतंगीच्या हुल्लडबाजांमुळे अनेक जण जखमी होतात. विशेषत: धारधार मांजामुळे दुचाकी चालकांचे गळे कापण्याची शक्यता अधिक असते. याची दखल घेत उद्या रविवारी शहरातील विविध १२ उड्डाणपूल सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रहदारीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला.
मकरसंक्रांतीच्या दिवशी आपण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संकल्प करतो अन् आनंदाची देवाणघेवाण करतो. पण या सणाच्या नावाखाली पतंगबाजीचा उन्माद दिसून येतो. काही पतंगबाज उड्डाणपुलाचा उपयोग पतंग उडविण्यासाठी करतात. तर काही पतंग पकडण्यासाठी पुलावर उभे राहतात. पतंगाच्या धारधार मांजामुळे विशेषत: दुचाकीस्वाराच्या जीवाला धोका निर्माण होतो. सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टिकोनातून १५ जानेवारी रोजी नागपूर शहरातील १२ उड्डाणपुलांवरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस उपायुक्त (वाहतूक) चेतना तिडके यांनी दिली.
- हे उड्डाणपूल राहणार बंद
- आदिवासी गोवारी स्मारक उड्डाणपूल सीताबर्डी.
- सक्करदरा उड्डाणपूल
- दिघोरी उड्डाणपूल
- गोळीबार पाचपावली उड्डाणपूल
- कडबी चौक ते सदर आकार बिल्डिंगकडे जोडणारा उड्डाणपूल
- कोकाकोला चौक उड्डाणपूल
- दहीबाजार उड्डाणपूल
- मेंहदीबाग उड्डाणपूल
- मानस चौक ते जयस्तंभ चौक उड्डाणपूल
- कल्पना टॉकीज चौक, मानकापूर क्रीडा संकुल समोरील उड्डाणपूल
- सदर उड्डाणपूल (काटोल रोड, मानकापूर)
- मनीषनगर उड्डाणपूल वर्धा रोड, (अजनी मेट्रो स्टेशन ते हॉटेल प्राईड)