दिवाळीत अन्न विभागाची कारवाई : २०२ नमुने प्रयोगशाळेतनागपूर : सणासुदीत अन्न प्रशासन विभागाने विभागात ५ ते २३ आॅक्टोबरदरम्यान राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत अधिकाऱ्यांनी २०२ खाद्यान्नाचे नमुने ताब्यात घेऊन विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविले तर ११ व्यापाऱ्यांकडून १२ लाख २४ हजार ५९७ रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त केला.विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांमध्ये धडक मोहीम राबविली. दूध, दुग्धमय पदार्थ, खोवा, मिठाई, सोयाबीन, मैदा, खाद्य तेल, कलाकंद, बर्फी, वनस्पती, रवा, मैदा, बेसन आदी खाद्यान्नांची तपासणी केली. दिवाळीपूर्वी बाजारात मोठ्या प्रमाणात खाद्यतेल, खोवा, मिठाई, मसाल्याच्या पदार्थांची विक्री केली जाते. नागपूर ही घाऊक बाजारपेठ असल्याने शहरातून जिल्ह्याच्या इतर ठिकाणी अन्नपदार्थ विकले जातात. सणात मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन तपासणीची धडक मोहीम राबविल्याची माहिती अन्न प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त वाकोडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. हरिओम कोल्ड स्टोरेज, कळमना येथे साठविलेला इतवारी येथील संजय अॅण्ड कंपनीची ७ लाख ५० हजार रुपये किमतीची भेसळयुक्त खसखस जप्त केली. याशिवाय लिबर्टी आॅईल मिल, खडगाव रोड, वाडी येथून १ लाख ३७ हजार रुपये किमतीचे १६४६ किलो वनस्पती तूप (निर्मल) जप्त केले. तसेच गणेश एन्टरप्राईजेस, वर्धमाननगर येथून ३७ हजाराचे ५५५ किलो वनस्पती, सखी साई एजन्सीच्या वाडी येथील गोदामातून ४० हजाराचे ४५० किलो सरसो तेल, भारत स्टोअर्स, कामठी येथून २४ हजाराचे ३०० किलो रिफाईन्ड सोयाबीन तेल, आरएमसी मार्केटिंग, खडगाव रोड, वाडी येथून ७० हजार रुपये किमतीचे ७५२ किलो वनस्पती (रजनी गोल्ड), हरिहर फूड्स कळमना यांच्याकडून ९६ हजाराची ६०० किलो बर्फी आणि साई इंडस्ट्रीज, लकडगंज येथून सुमारे ९ हजार रुपये किमतीचे ४९८ किलो भेसळयुक्त तांदळाचे पीठ अधिकाऱ्यांनी जप्त केले. सर्वच ठिकाणी अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याचे पालन होत नसल्याचे दिसून आले. ताब्यात घेतलेले नमुने प्रादेशिक लोक स्वास्थ्य प्रयोगशाळा, नागपूर आणि राज्य लोक स्वास्थ्य प्रयोगशाळा, पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात येईल, असे वाकोडे यांनी स्पष्ट केले. सदर कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी अभय देशपांडे, प्रवीण उमप, किरण गेडाम, श्रीमती सूरकर, अमितकुमार उपलप, ललित सोयाम यांनी सहआयुक्त (अन्न) शिवाजी देसाई, सहायक आयुक्त (अन्न) न.रं. वाकोडे व एम.सी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केली. सणासुदीत निर्भेळ अन्न मिळण्याकरिता विभाग कटिबद्ध असून ही कारवाई पुढेही सुरू राहील, असे शिवाजी देसाई यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
१२ लाखांचा माल जप्त
By admin | Published: October 28, 2014 12:25 AM