लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. याचा विचार करता चार राज्यांतून विमान व रेल्वेने नागपुरात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. बुधवारी पहिल्याच दिवशी दिल्लीहून विमानाने नागपूरला आलेले १२ प्रवासी कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत. या सर्व पॉझिटिव्ह रुग्णांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. त्यांच्या संपर्कातील सर्वांना कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबाबत मनपा प्रशासनाने सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा येथे वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता येथून विमानाने येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात येत आहे. विमानात बसण्यापूर्वी सर्व प्रवाशांनी त्यांची कोविड चाचणी करणे अनिवार्य आहे. नागपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी विविध शहरातून आलेल्या काही प्रवाशांकडे चाचणी रिपोर्ट नसल्याचे दिसून आले. अशा प्रवाशांची विमानतळ प्रशासनाद्वारे आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.
कोविडचा वाढता संसर्ग लक्षात घेता विमान प्रवास धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत गरजेच्या वेळीच प्रवास करावा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
.....
चाचणी रिपोर्ट नसताना १०३ जणांचा प्रवास
नागपूर शहरात विमानाने आलेल्या १०३ प्रवाशांकडे चाचणीचा रिपोर्ट नव्हता. यात अहमदाबाद येथील २४ प्रवासी, दिल्ली येथील ७९ प्रवाशांचा समावेश आहे. या सर्व प्रवाशांची विमानतळावरच चाचणी केली असता यातील १२ प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात मनपाच्या चमूद्वारे या सर्व प्रवाशांना कोविड दिशानिर्देशांचे पालन करण्याच्या सूचना देऊन त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची कार्यवाही सुरू आहे.