नागपूर : स्काऊट गाईड ट्रेनरची नोकरी लाऊन देण्याचे आमीष दाखवून १२ जणांकडून प्रत्येकी ८ लाख वसूल करणाऱ्या सात आरोपींविरुद्ध सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरु केला आहे.
लाकेश अमृत ननावरे (वय ३४, रा. भद्रावती), अनिकेत डोंगरे (वय ३४, रा. बेलतरोडी), अनिल डोंगरे (वय ४५), शेखर पानबुडे (वय ४२, रा. धरमपेठ), पंकज चौरागडे (वय ४६), पुरु मेश्राम (वय ४० रा. गोंदिया) आणि अनिमेश टेंभेकर (वय ३८, रा. नागपूर) अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी २५ मे २०१९ ते १ जून २०२३ पर्यंत सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत उज्वलनगर येथील हिंदुस्थान स्काऊट आणि गाईड संस्थेच्या कार्यालयात संगणमत करून व कट रचून फिर्यादी उमेश नानाजी काकडे (वय ३२, रा. सुर्य मंदिर वॉर्ड, सिंधी ले आऊट, भद्रावती जि. चंद्रपूर) यांना तसेच इतर ११ तक्रारदारांना नोकरीचे आमीष दाखविले.
आरोपींनी त्यांचे हिंदुस्थान स्काऊट आणि गाईड संस्थेंतर्गत विविध शाळांमध्ये कायमस्वरुपी स्काऊट गाईड ट्रेनरची नोकरी लाऊन देण्यासाठी प्रत्येकी आठ लाख रुपये मागितले. त्यामुळे फिर्यादी उमेश काकडे आणि ईतर ११ जणांनी आरोपींनी सांगितल्याप्रमाणे आरोपींना टप्प्याटप्याने आठ लाख रुपये दिले. आरोपींनी काकडे आणि इतर ११ जणांना संस्थेद्वारे प्रशिक्षणही दिले. त्यानंतर सर्वांना संस्थेचा शिक्का व स्वाक्षरी असलेले नियुक्तीपत्रही दिले. परंतु आरोपींनी कोणालाही कायमस्वरुपी नोकरी लाऊन न देता सर्वांची फसवणूक केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच उमेश काकडे यांनी सोनेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सोनेगाव पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब), ३४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरु केला आहे.