लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आमची लढाई ही संविधान वाचवण्याची आहे. काँग्रेस संविधान मानणारी आहे, म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आम्ही आजवर ज्या समाजाला प्रतिनिधित्वच मिळालेले नाही, अशा वंचित घटकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी काँग्रेसकडे १२ लोकसभेच्या जागांचा प्रस्ताव ठेवला आहे, त्यावर अजून चर्चा सुरू असेल असे आम्ही समजतो. हा प्रस्ताव काँग्रेसने मान्य केला तर काँग्रेसची सत्ता येऊ शकते. अन्यथा आम्ही पूर्ण ४८ जागा लढवणार, असे भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले.वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शुक्रवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सत्ता संपादन निर्धार मेळावा व संवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. या मेळाव्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, धनगर, भटके विमुक्तांसह विविध वंचित समाजाने आता हा निर्णय घेतला आहे की, स्वातंत्र्याच्या ७० वर्षात त्यांना कुठल्याच सरकारकडून काहीही मिळालेले नाही. त्यांचा केवळ वापरच करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता आपणच सत्ता हस्तगत करावी आणि आपले प्रश्न सोडवून घ्यावे. ही वस्तुस्थिती काँग्रेसने लक्षात घेणे गरजेचे आहे. यासाठी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे. काँग्रेस संविधानाला मानते म्हणून त्यांना लोकसभेच्या १२ जागा यामध्ये दोन माळी समाज, दोन लहान ओबीसी, दोन भटके विमुक्त, दोन मुस्लीम, दोन धनगर समाजासाठी मागण्यात आल्या आहेत.परंतु काँग्रेस यांना प्रतिनिधित्व देण्याच्या तयारीत नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी अलीकडेच एक वक्तव्य केले आहे की, मलाच त्यांच्यासोबत जायचे नाही. शरद पवार यांनी काँग्रेस सोडली तेव्हा सोनिया गांधी यांच्यासोबत मी गेलो नसतो तर देशात सोनिया गांधी यांचे नावही दिसले नसते, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.तत्पूर्वी देशपांडे सभागृहात पार पडलेल्या संवाद मेळाव्याला राजू लोखंडे, माजी आमदार लक्ष्मण माने, अॅड. विजयराव मोरे, माना समाजाचे रमेश गजबे, धनगर समाजाचे रमेश देवाजी पाटील, हलबा समाजाचे डॉ. सुशील कोहड, प्रा. बी.के. हेडाऊ, अरविंद सांदेकर, सागर डबरसे, लटरू मडावी, अॅड. संदीप नंदेश्वर, अजय सहारे आदींनी मार्गदर्शन केले.
नोटाबंदीदरम्यान आरएसएसला ३०० कोटीची गुरुदक्षिणानोटाबंदीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भाजपकडून ३०० कोटी रुपयांची गुरुदक्षिणा मिळाली, अशी टीका करीत त्या नोटा आरएसएसने कोणत्या बँकेत ठेवल्या किंवा कशा बदलून घेतल्या, असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. तसेच नोटा बदलवणे किंवा रद्द करण्याचा अधिकार पंतप्रधानांना नाही. तो रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला आहे. तेव्हा हा अधिकार पंतप्रधानांना कसा दिला, यासाठी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरविरुद्ध फौजदारी याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी मेळाव्यात दिला.
प्रकाश आंबेडकर यांना २०१९ मध्ये मुख्यमंत्री तर २०२४ मध्ये पंतप्रधान बनवणारलक्ष्मण माने यांनी महराष्ट्रातील सर्व वंचित घटकांनी आता २०१९ च्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री आणि २०२४ मध्ये पंतप्रधान करण्याचा संकल्प केला असल्याचे संवाद मेळाव्यात बोलताना जाहीर केले. पत्रपरिषदेत बोलताना त्यांनी दिल्ली येथे संविधानाची होळी करणाऱ्याविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच साध्या गणेश मंडळांनाही पावती फाडण्यासाठी नोंदणी आवश्यक असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी ती का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत आमचे सरकार आल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कायद्यानुसार नोंदणी करायला लावू अन्यथा त्यांच्या संघटनेवर बंदी घालू, असे जाहीर केले.