हिंगणा (नागपूर) : तालुक्यातील येरणगाव (दाभा) शिवारात मंगळवारी (दि. २५) सायंकाळी वादळ व अवकाळी पावसासह गारपीट झाली. गारांचा मार आणि छताच्या आवाजामुळे पाेल्ट्रीफार्ममधील तब्बल १२ हजार काेंबड्या मृत्युमुखी पडल्या. यात किमान १ लाख १२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पाेल्ट्री उद्याेजकाने सांगितले.
रोशन देवराव निंबूलकर यांचा येरणगाव (दाभा) शिवारात पोल्ट्री फार्म आहे. मंगळवारी सायंकाळी या शिवारात वादळासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यातच गारा काेसळू लागल्या. या गारा शेडच्या जाळ्यांमधून आत शिरत काेंबड्यांना लागल्या. शिवाय, गारांमुळे माेठ्या प्रमाणात छताचा आवाज येत असल्याने आतील काेंबड्या घाबरल्या हाेत्या.
या प्रकारामुळे दाेन शेडमधील प्रत्येकी सहा हजार याप्रमाणे एकूण १२ हजार काेंबड्यांचा मृत्यू झाला, असे राेशन निंबूलकर यांनी सांगितले असून, यात किमान १ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महसूल विभागाने या घटनेचा पंचनामा करून शासनाने याेग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.