नागपूरमधून (Nagpur) आगीची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे गंमत करत असताना एका १२ वर्षीय मुलाचा आगीत जळून मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना सिव्हिल लाइनच्या सीपीडब्ल्यूडी कॉलनीत घडली आहे. या घटनेमुळे परिवाराला मोठा धक्का बसला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
१२ वर्षीय मुलगा आपल्या आजीला आणि मामीला घाबरवत होता. यासाठी त्याने किचनमध्ये जाऊन गॅस सिलेंडरचा पाईप काढला. पण पाइप काढताच अचानक आगीने पेट घेतला आणि तो आगीत जळाला. पोलिसांनी सांगितलं की, या घटनेत मुलाची आजीही जखमी झाली आहे.
पोलीस अधिकारी विनोद चौधरी यांनी सांगितलं की, मुलगा ८व्या वर्गात शिकत होता. जेव्हा तो दीड वर्षांचा होता तेव्हापासून त्याचे आई-वडील वेगळे झाले होते. मुलाची आई छत्तीसगढच्या रायपूरमध्ये राहते. तर मुलगा आपल्या आजीकडे नागपूरमध्ये राहतो.
त्यांनी सांगितलं की मुलाची आजी (६०) आणि मामी (२६) दुपारी १२.३० वाजता किचनमध्ये काम करत होत्या. तेव्हाच मुलाने मस्ती केली आणि त्याने त्या दोघींना घाबरवण्यासाठी सिलेंडरचा पाइप ओढला. हे करत असताना त्याला दोघी ओरडल्याही. पण तो तरीही मस्ती करत राहिली आणि ही मस्तीच त्याला महागात पडली. जसा त्याने पाइप खेचला तशी अचानक आग लागली आणि यात मुलगा गंभीरपणे भाजला गेला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले.