नागपूर : डिप्टी सिग्नल भागातील दुर्गामाता चौकाजवळ भुयारी मार्गासाठी खोदलेल्या मोठ्या खड्ड्यातील पाण्यात पडून १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. २० फुट खोलीच्या पाण्यातून अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना असून प्रशासनाच्या अर्धवट कामामुळे निष्पाप मुलाचा जीव गेल्याचा आरोप करण्यात येत आहे.
पृथ्वी धनिराम मारखंडे असे मृतक मुलाचे नाव आहे. सायंकाळच्या सुमारास तो ५० बाय ३०० फुट आकाराच्या खड्ड्यात तयार झालेल्या कृत्रिम तलावाशेजारी मित्रांसोबत खेळत होता. खेळता खेळता मित्र तलावाच्या अगदी जवळ गेले व पृथ्वीचा पाय घसरून तो पाण्यात पडला. खड्ड्याची खोली २० फुट होती व पृथ्वी पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. त्याच्या मित्रांनी आरडाओरड करत मदतीसाठी इतरांना बोलविले. मात्र तोपर्यंत पृथ्वी पाण्यात बुडाला होता.
या घटनेची माहिती तत्काळ पोलीस व अग्निशमन दलाला देण्यात आली. खड्ड्याची खोली लक्षात घेता त्याचा मृतदेह शोधण्यासाठी कळमना अग्निशमन केंद्र, सुगत नगर अग्निशमन केंद्र, लकडगंज अग्निशमन केंद्र, गंजीपेठ अग्निशमन केंद्र, सक्करदरा अग्निशमन केंद्रातील बचाव पथक सहभागी झाले. जवळपास ४५ मिनिटांच्या शोधमोहिमेनंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. अग्निशमन दलाचे जवान श्रीकृष्ण नरवटे याने २० फुट खाली जात मृतदेह बाहेर आणला. त्याचा मृतदेह पाहताच नातेवाइकांनी व मित्रांनी हंबरडा फोडला.
स्थानिकांनी अनेकदा केल्या तक्रारी
डिप्टी सिग्नल भागातील ही जमीन रेल्वेची आहे. मनपातर्फे इतवारी-कळमना रेल्वे लाईनच्या शेजारी भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले. त्याची कुठलीही सूचना स्थानिकांना देण्यात आली नव्हती. खोदकाम सुरू असताना केबल्स लागल्याने काम थांबविण्यात आले व त्यानंतर तो खड्डा तसाच राहिला. पावसाच्या पाण्यामुळे २० फूट खोलीच्या खड्ड्यात पाणी भरले व त्याला कृत्रिम तलावाचे स्वरूप आले. स्थानिक नागरिकांनी या खड्ड्यामुळे खेळणाऱ्या लहान मुलांचा जीव धोक्यात येऊ शकतो, यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. या खड्ड्यासाठी मनपा प्रशासन जबाबदार आहे की, रेल्वे हा प्रश्न निर्माण होत आहे.