लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तब्बल पाच वेळा जगज्जेता ठरलेल्या भारताचा ग्रॅण्ड मास्टर विश्वनाथन आनंदला ६४ घरांच्या खेळात नागपूरच्या अवघ्या १२ वर्षाच्या रौनकने तब्बल ६ तास रोखून धरले. त्यातही पहिल्या चार तासात रौनक मास्टरवर वरचढ ठरला होता. एका छोट्याशा चुकीच्या चालीमुळे रौनकला मास्टरला पछाडण्यात अपयश आले. पण अवघ्या १२ वर्षाच्या मुलाने ४ वर्षाच्या खेळाच्या अनुभवावर जगज्जेत्याला घाम फोडला होता.जरीपटक्यातील रहिवाशी, सेंटर पॉर्इंट स्कूलचा ७ व्या वर्गाचा विद्यार्थी असलेला रौनक भरत साधवानी याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत अनेक मानांकन पटकावत नागपूरचे झेंडा रोवला आहे. बुद्धिबळात हा चिमुकला भविष्यात उंच भरारी घेईल, असे त्याच्या खिताबावरून दिसते आहे. रौनकच्या घरात बुद्धिबळाचा कुणी खेळाडू नाही. त्याच्या वडिलांना थोडीफार आवड आहे. तो ८ वर्षाचा असताना उन्हाळ्याच्या सुटीत वडिलांनी त्याला बुद्धिबळ शिकविले. तो या खेळात रमू लागला. त्याचे आकर्षण वाढले. ९ वर्षाचा असताना लोकल स्पर्धेमध्ये रौनकने पहिले पारितोषिक पटकावले. रौनकची खेळामध्ये रुची बघून वडिलांनी त्याला कोचिंग लावून दिले. त्यानंतर त्याचा खेळ इतका बहरला की, तो अवघ्या १२ वर्षाच्या वयात २०१८ मध्ये थेट जगज्जेत्याशी भिडला. एवढेच नाही तर तो अंडर १९ नॅशनल स्पर्धेमध्ये मोठ्या वयाच्या खेळाडूंशी झुंज देऊन ब्रॉन्झ मेडलचा मानकरी ठरला. रौनकची आंतरराष्ट्रीय रँकिंग २४३४ आहे.रौनकची आतापर्यंतची कामगिरी
- यंगेस्ट इंटरनॅशनल मास्टर फ्रॉम महाराष्ट्र
- दुबई येथे झालेल्या ज्युनियर अंडर १४ स्पर्धेत मध्ये गोल्ड मेडल
- नॅशनल ज्युनिअर अंडर १९ मध्ये ब्रॉन्झ मेडल
- एशियन युथ ब्लिथमध्ये सिल्वर मेडल
- एशियन युथ चेस चॅम्पियनशीपमध्ये ब्रॉन्झ मेडल
- २०१५ च्या कॉमन वेल्थमध्ये गोल्ड
- २०१४ मध्ये नॅशनल चेस चॅम्पियन
- २०१४ मध्ये स्टेट चेस चॅम्पियन