नागपूर : एका स्वयंसेवी संस्थेत वित्त अधिकारी असलेल्या व्यक्तीने १.२० कोटींची अफरातफर केल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमन शेखर राऊत (३०, महालक्ष्मी अपार्टमेंट, झिंगाबाई टाकळी) असे आरोपीचे नाव असून, तो सागर ज्योती शिक्षा निकेतन संस्थेच्या मुख्य शाखेत वित्त अधिकारी म्हणून कार्यरत होता. संबंधित संस्थेत प्रेमकुमार सॅम्युअल पोतराजू (वय ४०) हे सरचिटणीस आहेत. सुमन २०१८ पासून वित्त अधिकारीपदावर होता. तोच सर्व आर्थिक बाबी हाताळायचा. राऊतसह दोघांचे मोबाइल क्रमांकही संस्थेच्या खात्याशी जोडण्यात आले होते.
राऊतने खात्यातून अध्यक्ष व सचिवांचे मोबाइल क्रमांक काढून घेतले. त्याने फक्त त्याचा मोबाइल नंबर खात्याशी लिंक राहू दिला. त्यामुळे संस्थेच्या खात्यातील व्यवहारांचे मेसेज आणि ओटीपी फक्त त्याच्याच मोबाइलवर येऊ लागले. याचा फायदा घेत त्याने संस्थेच्या खात्यातून तब्बल १.२० कोटी रुपये काढले व आपल्या खात्यात वळते केले. याशिवाय त्याने संस्थेत अनेक आर्थिक व्यवहार अनधिकृतरीत्या केले आहेत. ही बाब समोर आली असता त्याला विचारणा करण्यात आली. मात्र त्याने टोलवाटोलवी केली. अखेर पोतराजू यांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. सदर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्ली पोलिसांकडून अटक
संबंधित संस्था गरीब मुले व महिलांच्या कल्याणासाठी कार्य करते. जुलै २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत राऊतने संस्थेच्या खात्यात २ कोटी ४२ लाख एक हजार रुपये बेकायदेशीरपणे जमा केले. या कालावधीत त्याने ४ कोटी ५५ लाख २८ हजार ५८४ रुपये काढले. त्याच्या साथीदारांच्या मदतीने त्याने संस्थेच्या दिल्लीस्थित खात्यातून ७ कोटी रुपये काढले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संस्थेने दिल्लीत तक्रार दाखल केली. दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली आहे.