लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या ३४६ टँकरपैकी १२० टँकर बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. या निर्णयामुळे पाणीपुरवठ्यासाठी टँक र खर्चात वर्षाला १० ते १२ कोटींची बचत होणार आहे. शहरात जलवाहिनी नसलेल्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. सध्या ३४६ टँकर आहेत. यावर दरवर्षी २८ कोटी रुपये खर्च होतो. १२० टँकर बंद के ल्याने खर्चात मोठी बचत होणार आहे.शहरात जलवाहिनी नसलेल्या भागामध्ये शासकीय निधी, अमृत योजना, विशेष निधी व नासुप्रद्वारे अनेक ठिकाणी जलवाहिनीचे जाळे टाकण्यात आले आहेत. मनपाद्वारे या जलवाहिन्या चार्ज करून नळ कनेक्शन देण्यात आले आहेत. नासुप्रद्वारे टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांपैकी लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज, आसीनगर व मंगळवारी झोनअंतर्गत ९५५ अभिन्यासापैकी ८७६ अभिन्यास मनपातर्फे चार्ज करून सुमारे १७,००० नळजोडण्या देण्यात आल्या. त्यामुळे या भागातील टँकर्सची मागणी कमी झाली. विशेष म्हणजे मागील वर्षी नागपूर शहरास नव्याने जोडण्यात आलेल्या हुडकेश्वर -नरसाळा या भागात शासकीय निधी अंतर्गत पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. या भागातील जलवाहिन्या चार्ज करून सुमारे ८,८४० नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. हुडकेश्वर नरसाळा भागामध्ये ७६ टँकरद्वारे दररोज ५३० फेऱ्या करण्यात येत होत्या. जलवाहिन्या चार्ज झाल्याने ९० टक्के भाग टँकरमुक्त झाला आहे. मार्च २०२० अखेरीस संपूर्ण हुडकेश्वर- नरसाळा टँकरमुक्त करण्याचे मनपाचे लक्ष्य आहे.आणखी १०० टँकर बंद करणारमनपा लवकरच आणखी १०० टँकर बंद करणार आहे. नासुप्रद्वारे वांजरा येथे बांधण्यात आलेली पाण्याची टाकी चार्ज झाल्यास कामठी मार्गावरील उप्पलवाडी, शिवनगर, धम्मदीपनगर, डायमंडनगर, हस्तीनापूर, बंधू सोसायटी, भीमवाडी आदी भागातील नागरिकांना नळ कनेक्शन दिल्यास या भागातील टँकरच्या ६० ते ७० फेऱ्या कमी होतील. नासुप्रद्वारे नारा व कळमना भागातील पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्णत्वास येत आहे. येत्या दोन महिन्यात दोन्ही भागातील टाक्या मनपाकडे हस्तांतरित होतील. त्यादृष्टीने सदर भागात अमृत योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या टाक्या चार्ज झाल्यावर नारा कमांड एरिया अंतर्गत समतानगर, पांजरा येथील टँकरच्या दररोजच्या ७० ते ८० फेऱ्या कमी होतील. कळमना टाकी चार्ज झाल्यास राजलक्ष्मीनगर, पार्वतीनगर, देवीनगर, गुलशननगर, राजीव गांधी नगर, कळमना या भागातील टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद करण्यात येईल. त्यामुळे येथील दररोजच्या १८० फेऱ्या कमी होतील. अमृत योजनेअंतर्गत लकडगंज झोन अंतर्गत सुरू असलेले जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यास दररोज ४५० फेऱ्या कमी होतील. त्यामुळे आणखी १०० टँकर कमी होणार आहेत.