सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. खबरदारीचे उपाय म्हणून शासनाने या पूर्वीच मेयो व मेडिकलला तातडीने ‘आयसीयू’ व ‘हाय डिपेंडन्सी युनिट’ (एचडीयू) तयार करण्याचा सूचना केल्या होत्या. त्यानुसार मेयोने १६० खाटांचे आयसीयू’ व ४४० खाटांचे ‘एचडीयू’ तर मेडिकलने २०० खाटांचे आयसीयू व ४०० खाटांचे ‘एचडीयू’ असे एकूण १२०० खाटांचे नियोजन केले होते. शासनाने याला तातडीने मंजुरी देत ३५ कोटींमधून शनिवारी २८ कोटी उपलब्ध करून दिले. पुढील चार आठवड्यात हे दोन्ही विभाग रुग्णसेवेत असण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाचा या तिसऱ्या टप्प्यात रुग्ण संख्या वाढतानाही दिसून येत आहे. एकूण कोरोना रुग्णाच्या संख्येत देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे तर राज्यात सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या शहरात नागपूर पाचमध्ये आहे. यामुळे नियोजनाच्या दृष्टीने वेगाने पावले उचलली जात आहे. याचे पहिले पाऊल म्हणजे, शासनाने कोरोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी शनिवारी ३५ कोटींना मंजुरी दिली. यातील २५ कोटी ‘बीडीएस’वर उपलब्धही करून दिले. तीन मजल्याच्या इमारतीत मेडिकलचे ‘आयसीयू’मेडिकलचा स्त्री रोग व प्रसुती विभाग, बालरोग विभाग व मेडिसन विभागासाठी प्रस्तावित आयसीयूची इमारत तयार आहे. परंतु यंत्रसामुग्री अभावी बंद आहे. आता या इमारतीचा उपयोग कोरोना रुग्णांसाठी होणार आहे. या इमारतीत २०० खाटांचे आयसीयू असणार आहे. तर वॉर्ड क्र. २५, वॉर्ड क्र. ४९, वॉर्ड क्र. १, २ व ३ मिळून ४०० खाटांचा आयसोलेशन वॉर्ड तयार केला जाणार आहे. मेयोमध्ये सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये आयसीयू मेयोचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया यांनी सांगितले, मेयोच्या सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये १६० खाटांचे आयसीयू तर ४४० खाटांचे ‘एचडीयू’ असणार आहे. मेयो, मेडिकलच्या आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरपासून ते ऑक्सिजनची सोय असणार आहे. या कार्याला शनिवारपासूनच गती देण्यात आली आहे.कमीत कमी दिवसात आयसीयू व एचडीयू उभे करायचे आहे. शासनाने खबरदारीचे उपाय म्हणून मेयो, मेडिकलमध्ये ‘आयसीय’ू व ‘एचडीयू’ उभारण्याने निर्देश दिले होते. त्यानुसार तातडीने नियोजन करण्यात आले आहे. मेडिकलमध्ये २०० खाटांचे ‘आयसीय’ू व ४०० खाटांचे ‘एचडीयू’ तर मेयोमध्ये १६० खाटांचे ‘आयसीयू’ व ४४० खाटांचे ‘एचडीयू’ उभे केले जाणार आहे. कमीतकमी दिवसात हे दोन्ही विभाग रुग्णसेवेत असणार आहे.डॉ. सजल मित्राअधिष्ठाता, मेडिकल