नागपूर : २०२२ चा पावसाळा न विसरण्यासारखा आहे. महाराष्ट्राला पावसाने अक्षरश: झाेडपले आणि बहुतेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. मात्र, एवढा पाऊस पडूनही राज्यातील अनेक तालुके मात्र सुकली आहेत. राज्यातील ३५५ पैकी ७४ तालुके प्रभावित असून ५८ तालुक्यांतील जलस्तर घटले आहेत व ११९६ गावे प्रभावित झाली आहेत. अहवालात नागपूर विभागाची स्थिती मात्र दिलासादायक आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे राज्यातील ५ मुख्य खाेऱ्यांचे १५३५ पाणलाेट क्षेत्रामध्ये विभाजन करून या परिसरातील पाणवहन, पुनर्भरण आणि साठवण उपक्षेत्रातील भूजल पातळीचे प्रतिनिधित्व करेल अशा ३९२० निरीक्षण विहिरी निश्चित केल्या आहेत. त्यापैकी राज्यातील ३७०३ निरीक्षण विहिरींचे ऑक्टाेबरमधील भूजल पातळीच्या नाेंदीच्या आधारे संभाव्य पाणीटंचाईचा अभ्यास केला आहे. २०२२ मध्ये माहे सप्टेंबरमध्ये भूजल पातळीचा मागील ५ वर्षांतील माहे सप्टेंबर महिन्यातील भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास करून अहवाल तयार करण्यात आला आहे. यानुसार ३७०३ पैकी ३०८९ निरीक्षण विहिरींमध्ये भूजल पातळीत वाढ झाली असून ६१४ विहिरींमध्ये सरासरीपेक्षा घट झाल्याचे आढळून आले आहे. ही घट चार गटांत विभागली आहे. त्यानुसार १ ते ३ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त घट झाल्याचे दिसून येत आहे. जलस्तर घटण्याबाबत ठाणे, पुणे आणि नाशिक विभागातील जिल्हे प्रभावित आहेत. अमरावती विभागाचे ८ तालुक्यांतील १६२ गावे प्रभावित आहेत. नागपूर विभागाची स्थिती सर्वाधिक समाधानी असून केवळ ७ गावे प्रभावित असल्याचे दिसून येत आहे.
जलस्तर घटलेल्या गावांची स्थिती
*विभाग - प्रभावित तालुके - ३ मीटरपेक्षा अधिक - २ ते ३ मीटर - १ ते २ मीटर - १ मीटरपेक्षा कमी*
- ठाणे - ८ - ० - ० - १०१ - १०१
- पुणे - १४ - ११ - ७८ - १४४ - २३३
- नाशिक - १५ - ०१ - ११ - १२० - १३२
- छ. संभाजीनगर - ८ - ०० - ०६ - ३८ - ४४
- अमरावती - १० - २४ - १८ - ३८ - ८१
- नागपूर - ०३ - ०० - ०० - ०७ - ०७
एकूण - ५८ - ३६ - ११३ - ४४९ - ५९८
मुख्य गाेष्टी
- राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी २८१ तालुक्यांत जलस्तर सरासरीपेक्षा वर. ७४ तालुक्यांत तूट.
- ७४ पैकी ६० तालुक्यांत २० टक्के, १२ तालुक्यांत २० ते ३० टक्के व दाेन तालुक्यांत ३० ते ५० टक्के तूट (काेल्हापूर व सातारा जिल्हा)
- पुण्याच्या ११ गावी व अमरावती विभागात अकाेल्यातील २४ गावांत जलस्तर ३ मीटरपेक्षा खाली आला.
- ठाणे विभागात रत्नागिरीच्या ९२ गावांत जलस्तर १ ते २ मीटरपर्यंत घटला व ९२ गावांत १ मीटरपेक्षा कमी घटला.
- नागपूर विभागातील ६३ पैकी केवळ ३ तालुके प्रभावित. यातील नागपूर व चंद्रपूरच्या १४ गावांत जलस्तर घटला पण नियंत्रणात.