नागपूर : सोमवारचा दिवस जिल्ह्यासाठी परत चिंतेचाच ठरला. २४ तासांतच जिल्ह्यात चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला, तर सलग तिसऱ्या दिवशी दोन हजारांहून अधिक रुग्ण आढळले. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांचा आकडादेखील १२ हजारांपार गेला आहे. विशेष म्हणजे चाचण्यांची संख्या घटली असताना रुग्णसंख्या त्या तुलनेत वाढली. एकूण चाचण्यांपैकी २८.२० टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळले असून, ही चिंताजनक बाब आहे.
सोमवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात २ हजार ४५१ रुग्ण सापडले. त्यातील १ हजार ९६१ रुग्ण शहरातील, तर ४०८ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. शहराबाहेरील ८२ रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ५ लाख ११ हजार ५२३ इतकी झाली आहे. सोमवारी चार मृत्यू नोंदविण्यात आले व त्यातील तीन मृत्यू शहरातील होते. एकूण मृत्यूचा आकडा १० हजार १३६ वर पोहोचला आहे.
सोमवारी जिल्ह्यात केवळ ८ हजार ६९० चाचण्या झाल्या. यातील ७ हजार ६९६ शहरातील, तर ९९४ चाचण्या ग्रामीण भागातील होत्या. रुग्णवाढीचा दर वाढल्याचेच चित्र आहे. सोमवारी जिल्ह्यातील ९८९ रुग्ण बरे झाले. त्यातील ७६० रुग्ण शहरातील, तर ११७ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या १० हजारपार
दरम्यान, जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा १२ हजारांवर गेला. सद्यस्थितीत जिल्ह्यात १२ हजार ६४५ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील १० हजार २१० रुग्ण शहरातील असून, २ हजार ३४९ रुग्ण ग्रामीणमधील आहेत. सक्रिय रुग्णांपैकी ९ हजार ६१७ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत, तर उर्वरित ३ हजार २८ रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात व संस्थात्मक विलगीकरणात आहेत.