लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सदरच्या रिझर्व्ह बँकेत १०० रुपयांच्या १२४ बनावट नोटा आढळल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी बनावट नोटा चलनात आणल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. रिझर्व्ह बँकेला ११ ते ३० सप्टेंबर दरम्यान या बनावट नोटा प्राप्त झाल्या. बँकेला वेगवेगळ्या ग्राहकांकडून या नोटा मिळाल्या होत्या. बँकेला तपासात १०० रुपयांच्या १२४ बनावट नोटा म्हणजे १२४०० रुपये बनावट असल्याची माहिती मिळाली. त्यांना तपासासाठी नाशिकच्या मुद्रणालयात पाठविण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या सहायक व्यवस्थापक रोहिणी टिपले यांनी याबाबत सदर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वेळोवेळी रिझर्व्ह बँकेला बनावट नोटा मिळत असतात.