लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भोसले राजवटीत बांधण्यात आलेला सक्करदरा तलाव हा नागपूर शहराचा ऐतिहासिक वारसा आहे. परंतु तलावाची साफसफाई होत नसल्याने तलावात गाळ व कचरा साचला आहे. कचरा, शेवाळ व झाडांमुळे तलावातील पाणी हिरव्या रंगाचे झाले आहे. डागडुजी होत नसल्याने तलावाच्या पायऱ्या खचत असल्याने काठावरील प्राचीन हनुमान मंदिराला धोका निर्माण झाला आहे. ते कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे.तलावाच्या विकासासाठी सव्वाशे कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच या तलावाचा कायापालट होईल. अशी आश्वासने गेल्या साडेचार वर्षापासून मिळत आहे. परंतु ही फाईल अडकली कुठे, असा प्रश्न दक्षिण नागपुरातील लोकांना पडला आहे. तलावाच्या देखभाल व विकासाकडे लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. बाजूला नासुप्रचे उद्यान आहे. तर समोरच्या भागात बॉलिवूड सेंटर पॉर्इंट हॉटेल आहे. उद्यान बीओटीवर देण्यात आले आहे. येथे नागरिक सुविधा उपलब्ध न करता उद्यान समारंभाला भाड्याने देण्याचा प्रकार सुरू आहे. यातून निर्माण होणारा कचरा तलावाच्या काठावर वा तलावात टाकला जातो. दोन्ही बाजूने तलावात कचरा टाकला जात असल्याने तलावातील पाणी प्रदूषित झाले आहे.नागपूर शहरातील प्रमुख तलावात सक्करदरा तलावाचा समावेश आहे. या तलावाचा विकास झाला तर दक्षिण नागपुरातील हे एक चांगले पर्यटन स्थळ होऊ शकते. विधानसभा निवडणुकीपूर्वी या तलावातील काही भागातील गाळ काढण्यात आला. सोबतच १२५ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आल्याने तलावाचा लवकरच कायापालट होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र निवडणुका संपताच नेत्यांना तलावाचा विसर पडला. यामुळे नागरिकांत प्रचंड नाराजी आहे.प्लास्टिक व कचऱ्याचे ढिगारेतलावाच्या काठावर कचरा व प्लास्टिक टाकले जाते. यामुळे तलाव परिसराला कचराघराचे स्वरूप आले आहे. साफसफाई होत नसल्याने दुर्गंधी पसरल्याने फिरण्यासाठी येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.घाणीमुळे कचरा घराचे स्वरूपशहरातील तलावांचे संवर्धन झाल्यास पर्यटनासोबत भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्याला मदत होऊ शकते. परंतु दूषित पाण्यामुळे आजूबाजूच्या विहिरींचे पाणी दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तलावाच्या काठावर घाण साचल्याने परिसराला कचरा घराचे स्वरूप आले आहे.संरक्षण भिंतीला तडेतलावाच्या संरक्षण भिंतींना तडे गेले आहेत. यामुळे तलावाच्या काठावर खेळणाऱ्या लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. डागडुजी व दुरुस्ती नसल्याने तलावाच्या पायऱ्या खचत आहे. तलावात झाडे वाढल्याने विदू्रप स्वरूप आले आहे.डासांचा प्रादुर्भाव वाढलातलावातील दूषित पाण्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.१२५ कोटी गेले कुठेसक्करदरा तलावाच्या काठावर सकाळ -संध्याकाळ फिरणाऱ्यांची गर्दी असायची. परंतु देखभाल व दुरुस्ती नसल्याने तलावाला अवकळा आली आहे. पाणी प्रदूषित झाले असून घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. महापालिका प्रशासनाला या संदर्भात वारंवार पत्र दिले. परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नाही. साफसफाई होत नसल्याने कचरा साचला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तलावाचा विकास करण्यासाठी १२५ कोटींचा निधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. साडेचार वर्षे झाल्याने १२५ कोटी कुठे गेले असा प्रश्न दक्षिण नागपुरातील लोकांना पडला आहे.
संजय महाकाळकर, माजी विरोधीपक्षनेते मनपा