लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यातील १२५. २५ कोटींच्या सहा मोठ्या पाणीपुरवठा योजनांना येत्या चार-पाच दिवसात शासन मंजुरी देणार आहे. याबाबतचा निर्णय मंगळवारी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे मुुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे मजिप्राचे सचिव वेल रासू, पाणीपुरवठा प्रधान सचिव घनश्याम गोयल, मजिप्राचे अधीक्षक अभियंता सतीश सुशीर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळावी यासाठी सकारात्मक भूमिका घेतली तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.कामठी तालुक्यातील बिडगाव तरोडी पाणीपुरवठा योजना ५.९३ कोटी रुपयांच्या निविदेला एमएस कार्यालय निविदा कमिटीकडून मंजुरी घेण्यात यावी. तसेच भिलगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बचतीच्या रकमेतून खसाळा गावाकरिता अतिरिक्त वितरण व्यवस्थोला मंजुरी देण्यात येणार आहे. ही योजना २१.६४ कोटींची असून अतिरिक्त वितरण व्यवस्थेला ५२ लाख रुपये खर्च येणार आहे.नागपूर पेरी अर्बन पाणीपुरवठा योजनेंतर्गत मंजूर २७५ किमी वितरण व्यवस्थेंतर्गत अतिरिक्त टाकलेल्या १० किमी वितरण व्यवस्थेला मंजुरी मिळणार आहे. तसेच बोखारा पाणीपुरवठा योजनेंतर्गत पीयूसी पाईप लाईन बदलविण्याच्या ८६ लक्ष रुपयांच्या वितरण व्यवस्थेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार आहे. टाकळघाट पाणीपुरवठा योजना १३.५० कोटी योजनेला प्रशासकीय मंजुरी देण्यात येईल. ४४ कोटींच्या नीलडोह-डिगडोह पाणीपुरवठा योजनेला लवकरच प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. कामठी शहर पाणीपुरवठा योेजना (२७.८७ कोटी) व कामठी कॅन्टॉनमेंट पाणीपुरवठा योजना (९.४५ कोटी) प्रशासकीय मंजुरी देण्यात येत आहे.चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकत्याच जिल्ह्यात पाणीटंचाईच्या आढावा बैठकी घेतल्या. यात अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजना बंद असल्याचे लक्षात आले. त्या योजनांची माहिती आजच्या बैठकीत मागविण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील लहानलहान पाणीपुरवठा योजना केवळ साध्या दुरुस्तीसाठी १५ वर्षांपासून बंद असल्याचे आढळले. या पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी सुमारे अडीच ते तीन कोटी रुपये खर्च येणार असून या खर्चालाही आजच्या बैठकीत मान्यता देण्याचा निर्णय झाला. सावनेर तालुक्यात २२ योजना, कळमेश्वर तालुक्यात ९ योजना, मौदा तालुक्यात निमखेडा येथील एक योजना, रामटेक तालुक्यात परसोडा येथील एक योजना, नागपूर तालुक्यात ११ पाणीपुरवठा योजना व कामठी तालुक्यातील ८ पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे. बैठकीत या पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करून त्या योजना सुरु करण्याचा निर्णय झाला.