लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपा प्रशासनाने मालमत्ता व पाणीकराची थकबाकी वसुलीसाठी अभय योजना सुरू केली आहे. गेल्या सात दिवसात थकीत मालमत्ता कराच्या ५६० कोटीपैकी ११.५० कोटी तर पाण्याच्या १०१.४३ कोटीपैकी तीन दिवसात ६३ लाखाची वसुली झाली आहे. कर भरण्यासाठी जनजागृतीत कमी पडल्याने योजनेला अपेक्षित प्रतिसाद दिसत नाही.
अभय योजनेंतर्गत मालमत्ता व पाणीकरधारकांना ८० आणि ५० टक्के दंड माफीचा लाभ मिळणार आहे. ही योजना १५ डिसेंबर २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१ यादरम्यान राबविण्यात येणार आहे. १५ डिसेंबर ते २३ डिसेंबर या काळात महापालिकेच्या खात्यामध्ये ११.५० कोटी मालमत्ता कर जमा झाला आहे. त्यामध्ये ४ हजार २४८ करदात्यांनी ४.८९ कोटी रुपये जमा करून १.४८ कोटी रुपये दंड माफ करून या योजनेचा फायदा घेतला आहे. मालमत्तासोबत पाणीकराची अभय योजनेंतर्गत २१ डिसेंबरपासून वसुली सुरू झाली असून, २ हजार ३२२ नागरिकांनी ६३.२१ लाख रुपये कर भरला आहे. शहरात ६ लाख ३५ हजार ९९५ मालमत्ता असून, त्यात ५ लाख ३१ हजार ८२२ इमारत व १ लाख ४ लाख १७३ भूखंड आहेत. थकीत रकमेवरील व्याजाची रक्कम १५७ कोटी आहे.