मंगेश व्यवहारे
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हा परिषदेच्या १२८ शाळा अंतिम घटका मोजत आहेत. शालेय शिक्षण विभागाने १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात नागपूर जिल्हा परिषदेच्या १२८ शाळांचा समावेश आहे. या शाळा १० पेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत. शासन या शाळांचे समायोजन करणार असे संकेत आहेत. समायोजनाचा अर्थच या शाळा बंद होणार हे निश्चित असा आहे.जिल्हा परिषदेच्या ९४ शाळांमध्ये विद्यार्थी संख्या ६ ते १० एवढी आहे. तर ३४ शाळांमध्ये विद्यार्थी संख्या पाचच्या खाली आहे. प्रत्येक शाळेत दोन शिक्षक नियुक्त आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या वेतनावर होणारा खर्च, सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेवर होणारा खर्च लक्षात घेता शासनावर कोट्यवधींचा बोजा पडतो आहे. त्यामुळे शासनाने १० पेक्षा कमी पट असलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करून या शाळा बंद करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिक्षण सचिवांच्या एका बैठकीत कमी पटसंख्येच्या राज्यात पाच हजार शाळा बंद करण्याचे टार्गेट होते. नागपूर जिल्हा परिषदेच्या १५३६ शाळा असून, ४३०० शिक्षक कार्यरत आहेत. जेवढे विद्यार्थी कमी तेवढी गुणवत्ता अधिक असे समीकरण मांडले जाते. पण कमी पटसंख्येच्या शाळेत उलट होत आहे. कमी पटसंख्येच्या शाळांची गुणवत्ता घसरत चालली असल्याचे निदर्शनास आले आहे. कारण कमी पटसंख्या असलेल्या शाळांना शिकविण्याची मानसिकता शिक्षकांची नसल्याचे दिसत आहे. तसेच विद्यार्थ्यांचीसुद्धा मानसिकता शिकण्याची नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे या शाळांमध्ये अप्रगत विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.कमी पटसंख्येच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शाळेत दाखल करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. घरापासून शाळा जर एक किलोमीटरच्या वर असेल तर विद्यार्थ्यांना प्रवास भत्तासुद्धा दिला जाणार आहे.-शासनाकडून १० पेक्षा कमी पटसंख्येची यादी आली आहे. पण या शाळा बंद होणार यासंदर्भातील निर्णय शासनाचा आहे. या शाळांचे कुठे समायोजन होऊ शकते, हे निश्चित झाल्यानंतर मंत्रिमंडळात निर्णय होईल. त्यानंतरच पुढची प्रक्रिया होईल.-चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. नागपूर