केंद्रीय पथकाची भेट : वर्धा, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी चर्चा वर्धा/अमरावती/यवतमाळ : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिीची पाहणी करणाऱ्या केंद्रीय पथकाला मंगळवारी वर्धा जिल्ह्यात विदारक चित्र दिसले. पथकाला जिल्ह्यातील विजयगोपाल गावातील एका शेतकऱ्याने १२ एकरात १२ किलोंपेक्षा कमी कापूस घरी आणल्याचे सांगितले. वर्धा जिल्ह्यासह अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात विविध गावांना भेटी देऊन शेतीची पाहणी केली. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे १० सदस्य असलेले पथक मंगळवारी वर्धा जिल्ह्यात दाखल झाले. सदर पथकाने दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास विजयगोपाल येथे येथील माहिती घेतल्यानंतर ते इंझाळा, कवठा नंतर बोदड या गावाला भेट देत वर्धेकडे रवाना झाले. विजयगोपाल येथील किशोर झोरे या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहणी केली. झोरे यांना उत्पन्नासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी तीन एकर शेतात २० किलो कापूस झाल्याचे सांगितले. तर शेतकरी बाळाजी म्हसे यांच्याशी पथकाने संवाद साधला असता त्यांनी १२ एकर शेतीत १२ किलो कापूस घरी आलेला नाही, अशी माहिती दिली. इंझाळा येथील शेतकरी बाबाराव चरडे यांची भेट घेत शेतीची पाहणी केली. या गावातून अवघ्या तीन मिनिटात पथक कवठा येथील शेतीची पाहणी करण्याकरिता रवाना झाले. या दोन गावात बराच वेळ झाल्याने पथकाने कवठा व बोदड या गावाला धावती भेट दिल्याची माहिती आहे.अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे तसेच हवामानातील बदलामुळे खरीप पिकांचे आणि फळपिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. त्यानुषंगाने केंद्र शासनाकडून आलेले पथक प्रमुख आर.पी. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली अन्य तीन सदस्यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जळू, टिमटाळा, सावनेर, शेलूनटवा या गावास भेट देऊन तेथील ग्रामस्थ, शेतकरी यांच्या भेटी घेतल्या, संवाद साधला, नुकसान झालेल्या कापूस, सोयाबीन या पिकांची तसेच संत्रा बागांची पाहणी केली. यवतमाळ जिल्ह्यात केंद्रीय पथकातील एका चमूने दोन तालुक्यातील शेतीची पाहणी केली, तर एक पथक सायंकाळी उशिरा जिल्ह्यात दाखल झाले. परंतु दुसरे पथक सायंकाळी ७ वाजेपर्यंत जिल्ह्यात पोहोचले नव्हते. पहिले पथक अमरावती जिल्ह्यातून बाभूळगाव तालुक्यातील नायगाव येथे दुपारी १ वाजताच्या सुमारास पोहोचले. कापूस विकास संचालनालयाचे संचालक आर.पी.सिंग यांच्या नेतृत्वातील या पथकाने शंकरराव नागोसे यांच्या शेताची पाहणी केली. तसेच गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर या पथकाने कळंब तालुक्यातील गांधा गावाला भेट दिली. श्रीराम कांबळे व रामाजी टेकाम यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. उमरखेड तालुक्यातील नागेशवाडी येथे केंद्रीय पथक दुपारी ५ वाजताच्या सुमारास येणार होते. शेकडो शेतकरी त्या ठिकाणी जमले होते. सायंकाळी ७ वाजेपर्यंत सदर पथक पोहोचलेच नव्हते. नागेशवाडी आणि महागाव तालुक्यातील मुडाणा येथे शेकडो शेतकरी पथकाची प्रतीक्षा करीत होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)
१२ एकरात १२ किलो कापूस
By admin | Published: December 17, 2014 12:26 AM