नागपूर : बँकेत गहाण ठेवलेले फ्लॅट विकून बिल्डरने ग्राहकांची १३ कोटींची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. अजनी पोलिसांनी दिव्य प्रयाग बिल्डर्सचा संचालक शशांक पांडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रामदासपेठ येथील रहिवासी असलेल्या शशांक पांडेने २०१३ मद्ये वंजारी नगर येथील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिव्यप्रयाग अपार्टमेंटच्या नावाने फ्लॅट स्कीम सुरू केली. या योजनेंतर्गत बांधलेल्या फ्लॅटवर पांडेने डीएचएलएफ बँकेकडून ११ कोटींचे कर्ज घेतले. त्याने न्यू सुभेदार लेआऊटचे रहिवासी राहुल धाबू यांच्यासह २२ जणांना ६० लाख आणि त्याहून अधिक किमतीला फ्लॅट विकले. फ्लॅट्स बँकेत गहाण असल्याची माहिती लपवून पांडेने हे व्यवहार केले. ग्राहकांनी फ्लॅट्सचे ‘सर्च रिपोर्ट’ काढले तेव्हा फ्लॅट गहाण असल्याचे दिसून आले नाही. त्यामुळेच त्यांनी फ्लॅट खरेदी केले होते.
मात्र, २०२० मध्ये बँकेने फ्लॅटधारकांना फ्लॅट्स रिकामे करण्याची नोटीस दिली. यानंतर धाबू आणि इतर फ्लॅटधारकांनी बँकेत चौकशी केली असता पांडेने फ्लॅट्सच्या नावाखाली कर्ज घेतल्याचे उघड झाले. पांडेने हे फ्लॅट्स १२ कोटी ८४ लाखांना विकले होते. शिवाय मेंटेनन्सच्या नावाखाली साडेपाच लाख रुपये घेतले होते. त्याने फ्लॅटधारकांची १२ कोटी ९० लाखांनी फसवणूक केली. धाबू यांनी अजनी पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी पांडेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
‘सर्च रिपोर्ट’मध्ये ‘गोलमाल’
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी करण्यात आलेल्या ‘सर्च रिपोर्ट’मध्ये कोणतीही थकबाकी दाखविण्यात आली नव्हती. त्यामुळे त्या ‘सर्च रिपोर्ट’वर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ‘सर्च रिपोर्ट’ बनावट होती की त्यातील काहीजण पांडेसोबत मिळालेले होते याचा शोधदेखील सुरू आहे.