नागपूर : खरीप हंगामातील खत आणि बियाण्यांच्या टंचाईवर मात करण्यासाठी आणि यातील काळाबाजार रोखण्यासाठी १३ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
जिल्हा कृषी विभागाने खत आणि बियाण्यांसाठी नियोजन केले आहे. त्यानुसार, जिल्ह्यात यंदा १,६०,४९२ मे. टन खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यात युरिया ४५,९१७.२ मे. टन, मिश्र खते ५१,०३७.६ मे. टन, डीएपी २२,७४०.६ मे. टन, एमओपी ४,८६७.३ मे. टन आणि एसएसपी ३५,९२९.३ मे. टन या खतांचा समावेश आहे. या सोबतच ८२,१२१ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. या पुरवठ्यातील अनियमितता, तसेच काळाबाजार रोखण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी संपर्क क्रमांकही देण्यात आला आहे.
जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यासोबतच १२ तालुक्यांसह नागपूर शहर व ग्रामीण मिळून १३ भरारी पथकांची स्थापना केली आहे. जिल्हा स्तरावरील पथक कृषी विकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात, तर तालुका स्तरावरील पथके तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली काम करतील.
मागील वर्षी खत-बियाणांच्या संदर्भात आठ ते नऊ तक्रारी दाखल झाल्या होत्या. काही ठिकाणी भरारी पथकाने छापे घालून कारवाया केल्या होत्या.
...
शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि तक्रारींसाठी स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षातील क्रमांकावर शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवाव्या. त्यानुसार चौकशी करून तातडीने अडचणी निवारल्या जातील, तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येतील.
- मिलिंद शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
...