नागपूर : मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा स्थापनेला ५९ वर्षे झाले असताना रिक्त पदांचा घोळ अद्यापही कायम आहे. परिणामी, या महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचा जागा वाचविण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा (एनएमसी) तपासणीत नागपूर मेडिकलचा मेडिसीन विभागाच्या आठ डॉक्टरांची तात्पुरती पदस्थापना या महाविद्यालयात करण्याची वेळ सरकारवर आली. यामुळे नागपूर मेडिकलच्या ‘पीजी’ १३ जागा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालविण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान आयोगाचे (एनएमसी) निकष पाळणे सक्तीचे आहे. त्यासाठी ‘एनएमसी’ची टीम दरवर्षी महाविद्यालयांचे निरीक्षण करते. या निकषांना पात्र ठरण्यासाठी राज्यातील सतराही शासकीय महाविद्यालये दरवर्षी शिक्षक पळवापळवीची कसरत करतात. गेल्या १९ वर्षांपासून हा खेळ सुरू आहे. आता मिरजच्या जागा वाचविण्यासाठी नागपूर मेडिकलच्या मेडिसीन विभागाच्या तब्बल आठ डॉक्टरांची उसनवारी बदली दाखविण्यात आली. यात एक प्राध्यापकासह, तीन सहयोगी प्राध्यापक व चार सहायक प्राध्यापकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातीलच काही डॉक्टरांची उसनवारी बदली नुकतेच २३ आॅगस्ट रोजी चंद्रपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर २६ मार्च रोजी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दाखविण्यात आली होती. यामुळे ‘एनएमसी’ यावर बोट ठेवत नागपूर मेडिकलच्या मेडिसीन विभागाच्या वाढलेल्या पीजीच्या १३ जागा कमी करण्याची शक्यता आहे.
-एक सहयोगी व चार सहायक प्राध्यापकांची बदली
तूर्तास मेडिकल प्रशासनाने मेडिसीन विभागाच्या आठ डॉक्टरांपैकी एक सहयोगी व चार सहायक प्राध्यापकांची तात्पुरती पदस्थापना मिरज मेडिकलमध्ये करून गुरुवारी त्यांना कार्यमुक्त केले. एकीकडे नवे वैद्यकीय महाविद्यालये उभारून डॉक्टरांची संख्या वाढविण्याचा बाता करायच्या, दुसरीकडे महाविद्यालयातील रिक्त जागा भरण्याकडे दुर्लक्ष करायचे, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानासोबतच रुग्णसेवा प्रभावित होत आहे. ‘एनएमसी’चे निकष पाळण्यासाठी डॉक्टरांची पळवापळवी कधी थांबणार हा प्रश्न आहे.