नागपूर : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरुद्ध दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने अभियान राबवून १३ दलालांना अटक केली असून, त्यांच्याकडून १ लाख २५ हजार ९१९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दपूम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त पंकज चुघ यांच्या निर्देशानुसार विभागात पर्सनल युझर आयडीवरून अवैधरीत्या ई- तिकीट बनविणाऱ्या दलालांची धरपकड करण्यात आली. यात मोतीबाग ठाण्यांतर्गत १, इतवारी १, भंडारा ४, गोंदिया १, छिंदवाडा १, नैनपूर २, नागभीड १, गुप्तचर शाखा गोंदिया १, नागपूर गुप्तचर शाखा १ यांनी कारवाई करून एकूण १३ दलालांची धरपकड करून त्यांच्या विरुद्ध रेल्वे ॲक्ट १४३ नुसार गुन्हा दाखल केला. या दलालांकडून १८ पर्सनल आयडीच्या माध्यमातून काढलेले ११ लाइव्ह तिकीट, जुने १२२ तिकीट किंमत १ लाख २५ हजार ९१९ रुपये जप्त करण्यात आले. यासोबतच या दलालांकडील संगणक, लॅपटॉप, मोबाइल जप्त करण्यात आले. दलालांना अटक करून रेल्वे न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. प्रवाशांनी अधिकृत एजंट किंवा रेल्वे काउंटरवरून तिकीट खरेदी करून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे सुरक्षा दलाने केले आहे.
...............