आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : जिल्ह्यात रामटेक आणि नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. याअंतर्गत विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यात नागपूर लोकसभा मतदारसंघातील ८ तर रामटेक लोकसभा मतदारसंघात ५ युवा मतदान केंद्रे असणार आहेत. मतदान केंद्रांवरील युवा मतदारांची संख्या अधिक आहे, अशा मतदान केंद्रांचा यात समावेश आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघातील काटोल विधानसभा मतदारसंघातर्गत नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र. ५ काटोल आणि जि.प. उच्च प्राथमिक शाळा क्र. २ सावरगाव, सावनेर विधानसभा मतदारसंघातील नगर परिषद माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय नवीन इमारत खोली क्र. ३, हिंगणामधील जि.प. उच्च प्राथमिक शाळा वानाडोंगरी, उमरेड विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद सांस्कृतिक भवन, पंचायत समिती, भिवापूर ही युवा मतदान केंद्रे असणार आहेत.
नागपूर लोकसभा मतदारसंघांतर्गत नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात सोमलवार हायस्कूल खामला, विद्याभानु जीवन शिक्षण विद्यालय, पार्वती नगर खोली क्र. ७, नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातील मनपा उच्च प्राथमिक शाळा वाठोडा, खोली क्र.१, नागपूर मध्य पन्नालाल देवडिया हिंदी मिडल स्कूल, नागपूर पश्चिम एनएमसी झोन कार्यालय, मंगळवारी छावनी, झोन क्र. १० छावनी आणि सेंट जॅान हायस्कूल सेंट जॅान रोड, गड्डीगोदाम आणि नागपूर उत्तर विधानसभा मतदासंघातील लिटल चॅम्पियन, बालवाडी तुकाराम नगर, कळमना आणि संत चोखामेळा गर्ल्स हायस्कूल (एससीएस गर्ल्स) पाचपावली अशा एकूण १३ केंद्रांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ज्या मतदारसंघातील मतदान केंद्रांवरील युवा मतदारांची संख्या ही इतर वयोगटातील मतदारांच्या तुलनेत जास्त असते, त्या ठिकाणी साधारणतः युवा मतदार केंद्रांची निर्मिती केल्या गेली आहे. अधिकाधिक मतदानाला प्रोत्साहन मिळावे, अधिकाधिक युवकांनी मतदानासाठी प्रोत्साहित होत जिल्ह्याचे ७५ टक्क्यांवर मतदानाचे ध्येय पूर्णत्वास न्यावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले आहे.