नरेश डोंगरे
नागपूर : १३ वर्षीय प्रेयसीने तिच्या १८ वर्षीय प्रियकराकडे ‘चल कही दूर... निकल जाये’ असा हट्ट मांडला अन् तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला प्रियकर तिचा हात पकडून निघाला. बिहारमधून महाराष्ट्रात आलेले हे प्रेमीयुगूल तेलंगणात जाणार होते. मात्र, रेल्वे पोलिसांच्या नजरेत ते अडकले आणि सैराट सुटलेल्या बिहार-तेलंगणा लव्ह एक्स्प्रेसला नागपुरात ब्रेक लागला.
बिहारमधील रहिवासी असलेले सोनी आणि माही (दोघांचीही नावे काल्पनिक) हे जोडपे एकाच वस्तीत राहतात. दोघांच्याही घरची परिस्थिती बेताचीच. मात्र, त्यांचे प्रेम परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज होते. दोघांचे वय आणि काैटुंबिक स्थिती बघता आपले किमान पाच-सात वर्षे लग्न होणार नाही, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे आपल्या प्रेमाची नवी दुनिया बसविण्यासाठी सोनीने माहिकडे ‘चल कही दूर निकल जाये’ असा हट्ट धरला. त्यानेही मागचा पुढचा विचार न करता तिच्या सुरात सूर मिळवला.
कुठे जायचे, हे माहीत नाही. मात्र, हैदराबादकडे (तेलंगणा) चांगले काम मिळते, अशी माहिती मिळाली. त्यानुसार, सोनी आणि माहिने आधी आपले गाव आणि नंतर प्रांत सोडला. हैदराबादला जाण्यासाठी ते रेल्वेने नागपूरला तीन दिवसांपूर्वी पोहोचले. हैदराबादकडे जाणारी गाडी काही तासांनंतर येणार, असे समजल्याने सोनी आणि माही रेल्वेस्थानक परिसरात घुटमळू लागले. बराच वेळेपासून ते संशयास्पद अवस्थेत फिरत असल्याने सतर्क रेल्वे पोलिसांच्या नजरेत ते अडकले. पोलिसांनी चाईल्ड लाईनच्या माध्यमातून त्यांना रेल्वे ठाण्यात आणले. येथे त्यांची विचारपूस सुरू केली. दोघेही हुशार, त्यांनी बनावट ओळखपत्र दाखवून आपले वय वाढवून सांगितले. मात्र, मुलगी १३ ते १४ वर्षांपेक्षा जास्त वयाची नसल्याचे पोलिसांनी हेरले होते. त्यामुळे त्यांची धिटाईने विचारपूस सुरू झाली अन् या प्रेमीयुगुलाने आपली प्रेमकथा पोलिसांना सांगितली.
पोलिसांनी बोलविले, पालक पोहोचले
मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तिच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना नागपुरात बोलवून घेतले. ते येथे पोहोचल्यानंतर मुलीला त्यांच्या स्वाधीन केले. अशा प्रकारे बिहारकडून तेलंगणाकडे सैराट सुटलेल्या लव्ह एक्स्प्रेसला व्हॅलेंटाईन विक सुरू होण्यापूर्वीच नागपूर रेल्वे स्थानकावर ब्रेक लागला.