नागपूर : चॉकलेट खाण्यासाठी गुल्लकमधून पैसे काढल्याने आईने रागविल्यामुळे एका १३ वर्षीय मुलाने घरच सोडले. सायकलवरून तो कन्हान येथे पोहोचला. मात्र थकल्यामुळे दोन रात्र तेथीलच ढाब्यावर झोपला. अखेर पोलिसांच्या पथकाने त्याचा शोध घेत त्याला कुटुंबीयांच्या हवाली केले.
यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तो आईवडिलांसोबत राहतो. त्याला भाऊ व बहीणदेखील आहेत. २२ डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास कोचिंग क्लासवरून परत येत असताना तो चॉकलेट विकत घेण्यासाठी एका दुकानात थांबला. त्याच्या बहिणीने ते पाहिले व त्याला पैसे कुठून आले अशी विचारणा केली. गुल्लकमधून पैसे घेतल्याची त्याने कबुली दिली. बहिणीने आईला याची माहिती दिली व आईने त्याला रागविले. यामुळे तो सायकल घेऊन घराबाहेर निघाला.
घरच्यांना तो मित्राकडे गेला असल्याचे वाटले. मात्र रात्री उशिरापर्यंत न आल्याने त्याची शोधाशोध करण्यात आली. मात्र तो न सापडल्याने यशोधरानगर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी त्याची शोधाशोध सुरू केली. पोलिस आयुक्तांच्या निर्देशावरून गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांनीदेखील पथक गठित केले. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले व अखेर तो कन्हानजवळील एका ढाब्यावर असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे पोहोचून त्याला कुटुंबीयांच्या हवाली सोपविले. रेखा संकपाळ, राजेंद्र अटकाळे, सुनील वाकडे, मनीष पराये, शेख शरीफ, पल्लवी वंजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
थकल्याने ढाब्यावर थांबला
संबंधित मुलगा घरून तर निघाला व कन्हानच्या दिशेकडे सायकल घेऊन गेला. मात्र थकल्याने तो एका ढाब्यासमोर थांबला व ओट्यावरच झोपला. ढाब्याचे मालक ओमरे यांनी त्याला उठविले असता त्याने भूक लागल्याचे सांगितले. तेथे त्याला खायला दिले व रात्री तो तेथेच झोपला. तो स्वत:ची काहीच माहिती सांगत नव्हता, त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याला कन्हान पोलिस ठाण्यातदेखील नेले. मात्र पोलिसांनी त्यांचे म्हणणे गंभीरतेने ऐकून घेतले नाही. ओमरे यांनी त्याला ढाब्यावरच थांबवून ठेवले होते. अखेर नागपूर पोलिसांना त्याचा सुगावा लागला.