नागपूर : ‘त्याचे’ वय अवघे १३ वर्षांचे. सर्वसामान्य मुलांसारखेच शाळेत जाऊन खेळण्या बागडण्याचे. पण नशिबाने कलाटणी दिली. ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला. कुटुंबातील आनंदच हिरावला. आता तो येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालयात उपचार घेतोय. मात्र दिवसेंदिवस ढासळत चाललेली प्रकृती आणि इलाजाचा वाढता खर्च यामुळे या कुटुंबासमोर मोठे संकट ठाकले आहे.
प्रशिक पुंडलिक ढगे असे या मुलाचे नाव. बुटीबोरीतील एका खाजगी कॉन्व्हेटमध्ये तो सातव्या वर्गात शिकतो. मूळचे शेडगाव (जि. वर्धा) येथील असलेले त्याचे वडील पुंडलिक ढगे हे बुटीबोरीतील एका कंपनीत ठेकेदारीमध्ये लेबरकाम करतात. बुटीबोरीत किरायाने राहतात. सर्वसामान्य मुलांसारखा असणारा प्रशिक सहा महिन्यांपूर्वी अचानक आजारी पडला. प्राथमिक उपचार केले. एका खाजगी रुग्णालयात केलेल्या चाचण्यांनंतर त्याला ब्लड कॅन्सर असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी १६ ते १८ लाख रुपयांचा खर्च सुचविला. ऐेपत नव्हती. अखेर राज्य कर्मचारी विमा रुग्णालयाच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालयात उपचार घेतले. किमोही दिले. त्यानंतरही त्याची प्रकृती ढासळली. सध्या प्रशिक विकलांग अवस्थेत बेडवर आहे. हसत्या खेळत्या कुटुंबाला चिंतेने ग्रासले आहे.
...
प्रशिकला मदतीची गरज
पदरमोड करून ठेवलेले ४ ते ५ लाख रुपये आतापर्यंत प्रशिकच्या उपचारात संपले. महागडा वैद्यकीय खर्च झेपणे वडिलांना कठीण झाले आहे. उपचारावरील खर्चासाठी मदतीची गरज पूर्ण करताना या कुटुंबाची प्रचंड ओढाताण सुरू असल्याने आता समाजातील दानशूरांकडून त्यांना मदतीची अपेक्षा आहे. बुटीबोरीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत त्याची आई प्रतिभा पुंडलिक ढगे यांच्या नावाने ३८८४९६६८०४१ क्रमांकाचे खाते (आयएफसी कोड - एसबीआयएन ०००९६८९) आहे.
...