लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : खत खरेदीसाठी दुकानात गेलेल्या व्यक्तीच्या चारचाकी वाहनातून अज्ञात आराेपीने १ लाख ३० हजार १४० रुपयावर हात साफ केला. ही घटना भिवापूर शहरात साेमवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास घडली.
झाले असे की, फिर्यादी संजय देवराव समर्थ (३५, रा. शंकरपूर, जि. चंद्रपूर) हे कापूस खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. १७ व १८ जानेवारीला त्यांनी भिवापूर व उमरेड बाजार समितीत अनुक्रमे ८ क्विंटल ३० किलो व १२ क्विंटल १२ किलो कापूस विक्री केला. या कापसाची रक्कम घेऊन संजय व त्यांचा सहकारी आपल्या एमएच-४०/बीजी-८९९५ क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने स्थानिक अन्नपूर्णा कृषी केंद्र येथे खत खरेदी करण्यासाठी आले. दरम्यान, जवळ असलेली संपूर्ण रक्कम एका पिशवीत टाकून ती चालकाच्या सीटमागे ठेवली. त्यानंतर दोघेही कृषी केंद्रात गेले. खरेदी करून ते परत आले असता, वाहनात ठेवलेल्या रकमेची पिशवी गायब असल्याचे आढळले. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून भिवापूर पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास हवालदार चंद्रकांत रेवतकर करीत आहेत.
....
लाल टी-शर्ट व काळा पॅन्ट
फिर्यादीने आपले मालवाहू वाहन कृषी केंद्राच्या गोडाऊनसमाेर उभे केले होते. काही मिनिटातच लाल टी-शर्ट व काळा पॅन्ट परिधान केलेला अंदाजे २५ ते ३० वयाेगटातील आराेपी वाहनाजवळ आला. त्याने थेट वाहनाच्या खिडकीतून चालकाच्या सीटकडे हात टाकला आणि रकमेची काळी पिशवी घेऊन क्षणात आरोपी पसार झाला. हे दृश्य कृषी केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीला वाहनात मोठी रक्कम असल्याचा अंदाज होता, अशी शक्यता पाेलिसांनी वर्तविली आहे.