नागपूर : खामगाव वनप्रकल्प विभागात १३४ कोटी रुपये खर्च करून लावलेली झाडे भ्रष्टाचाराने गिळली आहेत. यापैकी एकही झाड सध्या जिवंत नाही, असा दावा महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे सेवानिवृत्त लेखा सहायक मधुकर चोपडे यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला पत्र लिहिले आहे. १९८८ ते २००३ या काळात खामगाव वनप्रकल्प विभागात रोजगार हमी योजनेंतर्गत झाडे लावण्याची ३६१ कामे करण्यात आली आहेत. यासाठी बुलडाणा येथील उपवनसंरक्षकांनी १३४ कोटी रुपये दिले आहेत. या रकमेत किती झाडे लावण्यात आली, लावलेल्या झाडांची जातनिहाय संख्या, लावलेल्या झाडांपैकी किती झाडे जिवंत आहेत, जिवंत झाडांची जातनिहाय संख्या, जिवंत झाडापासून शासनास किती रुपये महसूल प्राप्त झाला आहे, याबाबत माहिती मागितली असता ती देण्यात आलेली नाही. या कामातील भ्रष्टाचारासंदर्भात १ सप्टेंबर २०१४ रोजी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) नागपूर यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आला होता. कोणतीही चौकशी वा कारवाई न करता हा अर्ज २६ डिसेंबर २०१४ रोजी महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांकडे पाठविण्यात आला . तत्पूर्वी १४ आॅक्टोबर २०१३ रोजी वनमंत्री तर, १० डिसेंबर २०१३ रोजी उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठविण्यात आले होते. पत्रासोबत भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे सादर करण्यात आले होते. शासनाने भ्रष्टाचारात सामील वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांकडूनच चौकशी करून प्रकरण दडपून टाकले, असा आरोप चोपडे यांच्या पत्रात करण्यात आला आहे. चोपडे यांनी महामंडळात ३५ वर्षे नोकरी केली असून ते ३१ जुलै २०१० रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. (प्रतिनिधी)
भ्रष्टाचाराने गिळली १३४ कोटींची झाडे
By admin | Published: May 13, 2015 2:43 AM