लोकमत न्यूज नेटवर्क
माैदा : अराेली पोलिसांनी माेरगाव शिवारात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडले. त्यात तिघांना अटक केली असून, त्यातील चार गुरांची सुटका करीत १३ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (दि.५) सकाळी ९ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
माेरगाव शिवारातून गुरांची वाहतूक केली जात असल्याची गुप्त सूचना पाेलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी माेरगाव शिवारात नाकाबंदी सुरू केली. दरम्यान, एमएच-३५/एएस-१६७५ क्रमांकाच्या बाेलेराे पिकअप वाहनाला थांबवून झडती घेतली असता, पिकअप वाहनात चार जनावरे (म्हशी व रेडे) कोंबली असल्याचे निदर्शनास आले.
ही गुरांची अवैध वाहतूक असल्याचे चौकशीत स्पष्ट होताच पोलिसांनी आराेपी दीपक राधेशाम कुंभलकर (२६, रा. माल्ही, ता. तिराेडा, जि. गाेंदिया), लाेकेश सुखदास भगत (२६, रा. गुलाब टाेला, ता. तिराेडा, जि. गाेंदिया) व वाहन मालक भास्कर गाेविंद बिसेन (३२, रा. बेरडीपार, ता. तिराेडा, जि. गाेंदिया या तिघांना अटक केली. पोलिसांनी पिकअप वाहनातील गुरांची सुटका करीत १२ लाख रुपयाचे पिकअप वाहन आणि १ लाख ४० हजार रुपये किमतीची जनावरे असा एकूण १३ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी अराेली पोलिसांनी गुन्हा नोंदवून आराेपींना अटक केली आहे. ठाणेदार अशाेक काेळी यांच्या मार्गदर्शनात गुन्ह्याचा तपास सहायक फाैजदार संताेष महंत करीत आहेत.