शरद मिरे/ नारायण चौधरी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: ‘त्या’ शाळेच्या इमारतीने आता आयुष्याची ‘साठी’ओलांडत ‘एकसष्टी’ गाठली आहे. इमारतीच्या भिंती भेगाळल्यात अन् छतालाही गळती लागली. शाळा व्यवस्थापनाने प्रशासन दरबारी धोक्याची घंटा वाजविली. प्रशासनानेही नवीन इमारत मंजूर न करता शाळा पाडण्याचे आदेश दिले. याला आता वर्ष उलटले. मात्र ना नवीन इमारत बनली ना जुन्या इमारतीला पाडण्याचे कौशल्य प्रशासनाने दाखविले. त्यामुळे गत पाच दिवसापासून भगवानपूरची जि.प. शाळा इमारतीत नव्हे तर चक्क खुल्या पटांगणात भरत आहे.हे विदारक आणि तितकेच भयावह वास्तव प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उठविणारे आहे. भिवापूर तालुक्यातील भगवानपूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतचे १३५ विद्यार्थी शिक्षण घेतात. हे सर्व विद्यार्थी भगवानपूरसह खापरी, सायगाव, पोडगाव, वाढोणा आदी आजूबाजूच्या गावातील आहे. १९५८ मध्ये विटा व मातीची जुडाई आणि कौलारू छत अशा प्रकारच्या बांधकामातून भगवानपूर येथे जिल्हा परिषदेची शाळा उभारण्यात आली. या शाळेच्या इमारतीला आता ६० वर्ष पूर्ण झाले. जीर्णावस्थेमुळे शाळा मोडकळीस आली आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने २९ डिसेंबर २०१८ रोजी ठराव घेऊन नवीन इमारतीसाठी जि.प.च्या शिक्षणाधिकाऱ्याकडे अर्ज केला. मात्र त्यावर योग्य कारवाई करण्याचे औदार्य प्रशासनाने दाखविले नाही. दरम्यानच्या काळात शाळेची जीर्ण इमारत पाडण्यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाकडे जिल्हा परिषदेकडून आदेश आले.मात्र ग्रामपंचायतीने सुध्दा या आदेशाला व निर्माण होणाºया धोक्याला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे शाळेचा डोलारा आहे त्याच पडक्या इमारतीवर उभा आहे. त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक टी.एम. पडोळे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे विद्यार्थ्यांसाठी बसण्याची पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी केली. मात्र शाळा सुरू होऊन पाच दिवस उलटले तरी प्रशासनाने शाळा व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याची अद्यापही दखल घेतलेली नाही. त्यामुळे भगवानपूरची शाळा एकप्रकारे उघड्यावर खुल्या पटांगणात भरत आहे.
नागपूर जिल्ह्यातील १३५ विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 12:32 PM
‘त्या’ शाळेच्या इमारतीने आता आयुष्याची ‘साठी’ओलांडत ‘एकसष्टी’ गाठली आहे. इमारतीच्या भिंती भेगाळल्यात अन् छतालाही गळती लागली आहे.
ठळक मुद्देपडक्या भिंती अन् गळके छत शाळा भरली खुल्या पटांगणात