नागपूर : रविवारी विविध माध्यमांतून ७८ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा झाला असून, सद्य:स्थितीत जिल्ह्यात १३७.५८ मेट्रिक टन इतका साठा उपलब्ध आहे. ऑक्सिजनच्या आवश्यकतेनुसार पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले असून, विभागातील तसेच शेजारच्या जिल्ह्यातील इस्पात उद्योगातून जास्तीत जास्त ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी रविवारी दिली.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कोरोना कोव्हिड रुग्णालयांना रोज १४८ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता निर्माण होऊ शकते. विभागातील इतर जिल्ह्यांना ५० टन ऑक्सिजन लागू शकतो. त्यानुसार ऑक्सिजनचे नियोजन करण्यात आले आहे. रविवारी जिल्ह्याला आदित्य पारक्ष इअर यांच्याकडून ४२ मेट्रिक टन, तर रेणुका येथून ३६ मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा प्राप्त झाला. अन्न व औषधी प्रशासनाचे नोडल अधिकारी सतीश चव्हाण यांच्यामार्फत जिल्ह्यातील व विभागातील रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्याचे वितरण करण्यात येत आहे.
पुरवठ्यासाठी १५ टँकर
नागपूर विभाग व जिल्ह्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी भिलाई, राऊरकेला, इत्यादी ठिकाणांवरून ऑक्सिजन वाहतूक करण्यासाठी १५ टँकरचा वापर करण्यात येत आहे.