नागपूर : जिल्ह्यातील रस्ते व पुलांची दुरुस्ती तसेच सरपंच भवन येथील सभागृह बांधकाम यासाठी १३८ कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेने राज्य सरकारकडे केली आहे.२०१३-१४ सालातील अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील रस्ते व पुलांचे प्रचंड नुकसान झाले होते. रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी १६० कोटींची मागणी केली होती. यातील जमेतम ३२ कोटींचा निधी मिळाला आहे. उर्वरित निधी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. सोबतच ७० कोटींचे प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे पाठविले आहे. जिल्ह्यात ८०९१. ४२ कि.मी. लांबीचे ग्रामीण तर २८५९ कि.मी. लांबीचे इतर जिल्हा मार्ग आहेत. या रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी जि.प.कडे आहे. एक कि.मी. लांबीच्या रस्ता दुरुस्तीसाठी एक ते सव्वा लाखाचा खर्च येतो. त्यामुळे सेस फंडातून ही कामे करणे शक्य नाही. रस्ते देखभाल व दुरुस्तीसाठी सरकारकडून दरवर्षी आठ ते नऊ कोटींचा निधी दिला जातो. परंतु जिल्ह्यातील रस्त्यांची लांबी विचारात घेता यातून दुरुस्ती शक्य नाही. त्यामुळे अतिवृष्टी व पुरामुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था वर्षभरापासून विस्कळीत झाली आहे. लोकांची गैरसोय होत असून विकास कामांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारकडे निधीची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील विकास कामासाठी हवे १३८ कोटी
By admin | Published: December 27, 2014 3:02 AM