लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकपदाच्या निवडणुकीसाठी एकूण ५७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले हाेते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी यातील १४ जणांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने, सध्या ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
या बाजार समितीच्या १८ संचालकपदांसाठी येत्या ३ ऑक्टाेबरला मतदान हाेणार आहे. त्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या १८ संचालकपदांसाठी एकूण ५७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले हाेते. यातील १४ जणांनी शुक्रवारी (दि.१७) त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले असून, उर्वरित ३९ जणांचे आव्हान कायम आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये भाजप गटाचा एक, तर महाविकास आघाडी गटाचे १३ उमेदवार आहेत.
बाजार समितीच्या सेवा सहकारी गटातील ११ संचालकांसाठी २७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, ग्रामपंचायत गटातील चार संचालकांसाठी ९, व्यापारी-अडते गटातील दाेन संचालकांसाठी ४, हमाल गटातील एका संचालकासाठी दाेन उमेदवार रिंगणात आहेत. रिंगणातील उमेदवार माघार घेतलेल्या उमेदवारांची मनधरणी करीत असल्याचेही दिसून येत आहे.
...
उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
चरणसिंग ठाकूर, नितीन डेहनकर व विनायक मानकर यांनी सेवा सहकारी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केले हाेते. ते सहकारी जिनिंग प्रेसिंगचे संचालक असल्याने, तसेच त्या संस्थेकडे बाजार समितीचा व्यापारी परवाना असल्याने, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गाैतम वालदे यांनी या तिघांनाही निवडणूक लढण्यास अपात्र ठरविले आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे दाद मागितली आहे. या प्रकरणात उच्च न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.