नागपूर : रेल्वेगाड्यात अवैैधरीत्या खाद्यपदार्थ विकणाऱ्या १४ अवैध व्हेंडरविरुद्ध आरपीएफने कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले. यात प्लॅटफार्म तिकीट खरेदी न करता रेल्वेस्थानक परिसरात फिरणाऱ्या दोघांना तसेच एका तृतीयपंथीलाही ताब्यात घेण्यात आले.रेल्वेगाड्यात निकृष्ट दर्जाचा संत्रा विकणारे अवैध व्हेंडर इटारसी आणि मुंबई एण्डकडील भागात तसेच आनंद टॉकीजच्या पुलाजवळील भिंतीमागे उभे राहून रेल्वेगाड्यात चढतात. मंगळवारी अशा १४ अवैध व्हेंडरवर आरपीएफने कारवाई केली. रेल्वे न्यायालयाने त्यांना प्रत्येकी १२०० रुपये दंड सुनावला. रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म तिकीट न घेता फिरणाऱ्या २ जणांनाही आरपीएफने अटक केली. त्यांना रेल्वे न्यायालयाने प्रत्येकी १२०० रुपये दंड सुनावला. तसेच पैशासाठी रेल्वेगाड्यातील प्रवाशांना छळणाऱ्या एका तृतीयपंथीलाही आरपीएफने ताब्यात घेतले. या तृतीयपंथीला रेल्वे न्यायालयाने १२०० रुपये दंड सुनावला. (प्रतिनिधी)
१४ अवैध व्हेंडरला पकडले
By admin | Published: January 13, 2016 3:22 AM