सुरक्षा व्यवस्थेचा अभाव : तिघे रेल्वेस्थानकावर सापडले नागपूर : उत्तर नागपुरातील पाटणकर चौक येथील शासकीय बाल सुधार गृहातून पुन्हा एकदा १४ अल्पवयीन मुले पळालीत. यातील तीन मुलांना बुधवारी पहाटे ३.३० वाजता रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी पकडले. फरार मुलांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा येथील सुरक्षा व्यवस्थेचे पितळ उघडे पडले आहे. जरीपटका पोलीस ठाणे हद्दीतील पाटणकर चौक येथे शासकीय बाल सुधार गृह (रिमांड होम) आहे. या बाल सुधार गृहात सध्या १०० पेक्षा जास्त मुले ठेवण्यात आली आहेत. मंगळवारी रात्री येथून १४ मुले फरार झालीत. परंतु याबाबत येथील प्रशासनाने रात्री उशिरापर्यंत गोपनीयता बाळगली. उशिरापर्यंत चाललेल्या शोधमोहिमेनंतरही मुले सापडली नाहीत. तेव्हा जरीपटका पोलिसांना सूचना देण्यात आली. जरीपटका पोलिसांनी मुलांचा अनेक ठिकाणी शोध घेतला. यासंदर्भात रेल्वे पोलिसांसह इतर ठाण्यातील पोलिसांनाही सूचना देण्यात आली. दरम्यान बुधवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकाच्या ६ नंबरच्या प्लॅटफार्मवर आरपीएफचे जवान विवेक कनोजिया व अर्जुन सामंत हे गस्त घालत असताना त्यांना तीन मुले संशयास्पद स्थितीत आढळून आली. त्यांची कसून विचारपूस केली असता ही मुले जरीपटका पोलीस ठाणे हद्दीतील बाल सुधार गृहातून पळाल्याचे आढळून आले. रेल्वे पोलिसांनी जरीपटका पोलिसांना सूचना दिली. जरीपटका पोलीसही रेल्वे स्टेशनवर पोहोचले. त्यांनी या मुलांना आपल्या ताब्यात घेतले. जरीपटका पोलिसांसह रेल्वे पोलीसही फरार मुलांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी) अशी पळाली मुलं मुलं ज्या पद्धतीने पळाली, त्यानुसार त्यांनी पळण्यासाठी योजना आखल्याचे दिसून येते. आपल्या निवासस्थानातील कुलूप तोडून मुलं इमारतीच्या वरच्या भागावर गेले. तिथे लागलेली साखळी बेसीनच्या रॉडच्या मदतीने तोडली. यानंतर झाडाच्या मदतीने ते खाली येऊन फरार झाले. फरार मुलांमध्ये मध्य प्रदेशातील पाच, ओडिशा दोन, भंडारा, दिल्ली, छत्तीसगड, उत्तर प्रदेश व तेलंगणा येथील प्रत्येकी एक, आणि नागपुरातील दोन मुलांचा समावेश आहे. यातील तीन मुलांना रेल्वे पोलिसांनी पकडले असून ११ मुलं अजूनही फरार आहेत.
बाल सुधार गृहातील १४ मुले पळाली
By admin | Published: March 30, 2017 2:26 AM