शरद मिरे
भिवापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कुठे बेड, तर कुठे ऑक्सिजन, व्हेंटिलेटरअभावी ग्रामीण भागात अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले. कोलमडलेल्या आरोग्य यंत्रणेचा खरा चेहरा दुसऱ्या लाटेत समोर आला. आता परिस्थिती नियंत्रणात येत असताना जिल्ह्यातील १४ कोविड केअर सेंटर तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे.
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा, असे सरकार वारंवार सांगत असताना ऐनवेळी ही बंद करण्यात येणारी कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करताना गतवेळसारखी तारांबळ तर उडणार नाही ना, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.
जिल्हा शल्यचिकीत्सक कार्यालयातून १७ जून रोजी यासंदर्भात आदेश निघाले आहेत. त्यात जिल्ह्यातील १४ कोविड सेंटर बंद करण्याबाबत नमूद आहे. यात काटोल (सीसीसी ५० बेड), हिंगणा (डीसीएच १५०), भिवापूर (सीसीसी ३०), कळमेश्वर (सीसीसी १००), पारशिवणी (डीसीएचसी ४८), नरखेड (सीसीसी ४०), मौदा (डीसीएचसी २०), उमरेड (सीसीसी ७७), सावनेर (सीसीसी ५०), रामटेक (सीसीसी ६०), कामठी (२ सीसीसी १००), नागपूर (२ सीसीसी ६२०) अशा १२ ठिकाणांवरील १४ कोविड सेंटर तात्पुरती बंद करण्याचे आदेश आहेत. यंदा फेब्रुवारी महिन्यात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला.
रुग्ण वाढत असताना कोविड सेंटर तत्काळ सुरू करणे, बेडची संख्या वाढविणे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर सुविधा उभ्या करण्यासाठी यंत्रणेला दुसरी लाट ओसरण्याची वाट पाहावी लागली, हे विशेष. आता जिल्ह्यातील व तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. प्रत्येक तालुक्यात कोविड सेंटर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड, डॉक्टर, परिचारिका, इतर आवश्यक बाबी सध्या तरी मोजक्या प्रमाणात का होईना कार्यरत आहेत. अशात संभावित तिसरी लाट आली तर ही यंत्रणा त्वरित कामाला लागणार आहे.
असा आहे आदेश
जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या आदेशात जिथे सक्रिय कोविड रुग्णांची संख्या कमी झाली, अशा संस्था तात्पुरत्या बंद करण्यात याव्यात. कंत्राटी मनुष्यबळ कमी करावे. सदर सेंटरमध्ये रुग्ण भरती असल्यास त्यांना अंतरानुसार जवळच्या संस्थेत स्थानांतरीत करावे. सदर सर्व संस्था तिसरी लाट आल्यास कार्यरत करता याव्यात, अशा स्थितीत ठेवाव्यात, असे या आदेशात नमूद आहे. हा आदेश मिळताच तालुकास्तरीय यंत्रणेला मात्र धक्का बसला आहे. कारण एकदा कोविड सेंटर बंद झाल्यानंतर ते पुन्हा सुरू करताना कंत्राटी डॉक्टर व परिचारिकांची जुळवाजुळव करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते, हे विशेष.
===Photopath===
180621\img-20210426-wa0076.jpg
===Caption===
भिवापूर येथील कोविड सेंटर