लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कार खरेदीची खोटी कागदपत्रे सादर करून वाहन कर्जाची उचल करणाऱ्या दोघांनी बँकेची १४ लाख रुपयांनी फसवणूक केली. हा प्रकार पाटणसावंगी (ता. सावनेर) येथे नुकताच उघडकीस आला आहे.सुरेंद्रसिंग गोविंदसिंग राठोड, रा. वेकोलि कॉलनी, चनकापूर, ता. सावनेर व खेमराज गिरीधर मोवाडे, रा. नागमंदिर, सावनेर अशी आरोपींची नावे आहेत.या दोघांनीही पाटणसावंगी येथील भारतीय स्टेट बँकेत वाहनकर्ज मिळविण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी अर्जासोबत खोटी कागदपत्रे जोडली होती. बँकेने कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना १४ लाख रुपयांचे वाहन कर्ज मंजूर केले. नंतर त्यांनी सादर केलेली कागदपत्रे खोटी असून, त्यांनी या रकमेची उचल करून कार खरेदी केली नसल्याचे निदर्शनास आले. या व्यवहारात बँकेची १४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच, बँकेचे प्रबंधक सुरेश रामचंद्र रामटेके (५९, रा. जरीपटका, नागपूर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी भादंवि ४०६, ४२०, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक गोपीचंद नेरकर करीत आहेत.
जिल्ह्यातील तिसरी घटनाबँकेत खोटी कागदपत्रे सादर करून वाहनकर्जाच्या नावावर बँकेची फसवणूक करण्याचा हा नागपूर जिल्ह्यातील महिनाभरातील तिसरा प्रकार होय. विशेष म्हणजे, आरोपींची या तिन्ही घटनांमध्ये भारतीय स्टेट बँकेच्या रामटेक, खापरखेडा (ता. सावनेर) व पाटणसावंगी (ता. सावनेर) शाखांमधून रकमेची उचल करून वाहन खरेदी न कता, ती रक्कम अन्य कामांसाठी वापरली. या प्रकारातील आरोपींची संख्या मोठी असून, बहुतांश आरोपी सावनेर शहर व तालुक्यातील रहिवासी आहेत. तिन्ही घटनांबाबत पोलिसांत तक्रार नोंदविल्या असल्या तरी, पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक केली नाही.