नरेश डोंगरे
नागपूर : एका प्रांतात राहून दुसऱ्या प्रांतात काम करणाऱ्या एका पित्याने स्वताच्या १४ महिन्यांच्या चिमुकलीला स्वत:च दुसऱ्या रेल्वेगाडीत सोडले आणि पत्नीला तिचे अपहरण झाल्याची थाप मारून गावाला घेऊन गेला. तेथे मात्र पत्नी आणि नातेवाईकांना संशय आल्याने प्रकरण पोलिसांकडे पोहचले त्यामुळे निर्दयी पित्याचा बुरखा फाटला. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. कृष्णकुमार राजकुमार कोसले असे आरोपी पित्याचे नाव असून तो रायपूर छत्तीसगडचा रहिवासी आहे.
अत्यंत गरिबीत जगणारा कोसले आपल्या पत्नीला घेऊन रोजगाराच्या शोधात चेन्नईला गेला होता. यावेळी त्याने आपला मुलगा रायपूरला राहणाऱ्या नातेवाईकांकडेच ठेवला. गर्भवती पत्नीच्या प्रसुतीची वेळ जवळ आल्याने तो पत्नी आणि मुलीसह गावाकडे परत येण्यासाठी निघाला. ७ नोव्हेंबरला नागपूर स्थानकावर आल्यानंतर गाडी नसल्याने त्याने पत्नी-मुलीसह रात्र रेल्वेस्थानकावरच काढली. दरम्यान, सकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी त्याने पत्नीचे लष नसल्याची संधी साधून त्याने आपली १४ महिन्यांची जिज्ञासा नामक मुलगी उचलली आणि १२१६० जबलपूर - अमरावती एक्सप्रेसच्या जनरल कोचमध्ये जाऊन बसला. गाडी सुरू होताच मुलीला तसेच ठेवून तो फलाटावर उतरला. दरम्यान, पत्नीने त्याच्याकडे विचारणा केली असता अज्ञात आरोपीने मारहाण करून जिज्ञासाला पळवून नेल्याची थाप मारली. त्यानंतर तिला रायपूरला घेऊन गेला. गावाला गेल्यानंतर पत्नी आणि नातेवाईकांना त्याचा संशय आला त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदविण्यावर भर दिला. त्यामुळे कृष्णा कोसले नागपुरात पत्नीसह परतला. प्रकरण शांतीनगर ठाण्यातून रेल्वे पोलीस ठाण्यात आले. माहिती देताना पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नामुळे तो गोंधळला आणि स्वत:च मुलगी जिज्ञासाला जबलपूर - अमरावती मार्गावर सोडल्याचे कबुल केले. त्यामुळे पोलिसांनी आरोपी पित्याला अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले.
महाभारत आणि कलियुग
कृष्णाचा जन्म होताच निर्दयी मामा कंसामुळे माता-पित्याने कृष्णाला स्वत:च्या छातीवर दगड ठेवून कोठडीतून दूर गोकुळात नेऊन ठेवले. ही अजरामर कथा आहे महाभारताची. कलियुगातील या कथेत मात्र कृष्णा नाव असलेल्या या पित्याने पोटच्या मुलीला निर्दयीपणे दुसरीकडे सोडले अन् स्वत: पोलीस कोठडीत जाऊन बसला.
निरागस जिज्ञासाची शोधाशोध
कोणताही दोष नसताना पित्याच्या निर्दयपणाला बळी पडलेली निरागस जिज्ञासा आता कुठे आणि कशी असेल, असा प्रश्न तिच्या नातेवाईकांसह पोलिसांना सतावत आहे. पोलिसांनी या चिमुकलीचा शोध लागावा यासाठी तिचे छायाचित्र प्रसिद्धीला दिले आहे. तिच्याबाबत काही माहिती असल्यास तातडीने जवळच्या पोलिसांना किंवा नागपूर रेल्वे पोलिसांना ८९९९६१९०२४ किंवा ९९२३१२४०५६४ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन ठाणेदार मनिषा काशिद यांनी केले आहे.