योगेश पांडे/ नागपूर : उपराजधानीतील १४ पोलीस ठाण्यांना नवीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिळाले आहेत. ४८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्यामुळे शहरातील अनेक ठाण्यांमध्ये प्रभारीभरोसे काम सुरू होते. अखेर पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांनी मंगळवारी रात्री आदेश जारी करत नवीन नावांची घोषणा केली.
या महिन्यात कधीही लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले. राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यात नागपुरातील ४८ पोलिस निरीक्षकांचा समावेश होता. ३० जून २०२४ पर्यंत तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या निरीक्षकांचा या यादीत समावेश होता. त्यामुळे अनेक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलून इतर शहरांत गेले.
गृहविभागाने जारी केलेल्या यादीनुसार शहराला ४७ नवीन पोलिस निरीक्षक राज्याच्या विविध भागांतून मिळाले होते. त्यातील १७ जणांच्या तात्पुरच्या बदलीचे ठिकाणी पोलीस आयुक्तांनी निश्चित केले व आदेश जारी केले. नितीन मगर (सोनेगाव), रणजीत सावंत (प्रतापनगर), प्रवीण काळे (एमआयडीसी), राजेश तटकरे (वाडी), आसाराम चोरमले (सिताबर्डी), मनिष ठाकरे (सदर), राजश्री आडे (मानकापूर), संतोष पाटील (कोतवाली), अरविंद महर्षी (गणेशपेठ), अशोक भंडारे (अजनी), कैलास देशमाने (हुडकेश्वर), पोपट धायतोंडे (नंदनवन), विजय दिघे (वाठोडा), राहुल आठवले (जरीपटका), युनुस मुलानी (विशेष शाखा), अनिल कुरळकर (विशेष शाखा) व सुरेश वसेकर (विशेष शाखा) यांना नियुक्ती देण्यात आली आहे.