नरेश डोंगरे। लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - कारागृह प्रशासनाला हादरा देणाऱ्या ‘मोबाईल प्रकरणाच्या चाैकशीत’ अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. कारागृहात बंदिस्त असलेल्या विविध गुन्हेगारांनी आतमध्ये बसून त्यांच्या - त्यांच्या पंटर्स, म्होरके, साथीदार आणि नातेवाइकांना शेकडो कॉल्स केल्याची माहिती उघड झाली आहे. प्रकरणाचे बिंग फुटण्यापूर्वीच्या अवघ्या चार आठवड्यांत केवळ एका सिमवरून १४०० वर कॉल्स झाल्याचेही उजेडात आले आहे. उघड झालेल्या या खळबळजक माहितीमुळे तपास करणारे पोलीसही अचंबित झाले आहेत.
कारागृहात मोबाईल अथवा कॅमेरा वापरण्यास, घेऊन जाण्यास प्रतिबंध आहे. कैद्यांना त्यांच्या आप्तस्वकियांशी किंवा वकिलाशी बोलायचे असेल तर येथे कारागृह प्रशासनाकडून विशिष्ट वेळेसाठी कैद्याला फोन उपलब्ध करून दिला जातो. खबरदारी म्हणून जेवढा वेळ कैदी फोनवर बोलेल तेवढा वेळ त्याच्या बाजूला कारागृहाचे कर्मचारी हजर असतात.
नागपूरच्या कारागृहात मात्र वेगळाच प्रकार होता. येथे अनेक गुन्हेगार मोबाईलवरून तासनतास ‘फोनो - फ्रेण्ड’ करीत होते. येथे एखाद दुसऱ्याकडून मोबाईलचा वापर होत नव्हता, तर कारागृहात एक प्रकारे समांतर दूरसंचार केंद्रच चालविले जात होते. सूरज कावळे अन् पीएसआय नितनवरे तसेच त्यांची टोळी कारागृहात मोठ्या प्रमाणात मोबाईल, सीम अन् बॅटरी मागवून घेत होते अन् वेगवेगळ्या गुन्हेगारांकडून तगडी रक्कम घेऊन त्यांना बाहेर बोलण्याची सुविधा उपलब्ध करून देत होते. १२ ऑगस्टपासून कावळे-नितनवरेचे दूरसंचार केंद्र जोरात सुरू होते. त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या केवळ एका सिमकार्डवरून १४०० पेक्षा जास्त कॉल्स करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. या मोबाईलचा वापर कुख्यात गुन्हेगार निषिद वासनिक, दिवाकर कोतुलवार यांनीही केल्याचे चाैकशीत स्पष्ट झाले आहे.
पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल
कारागृहात चालणाऱ्या या समांतर दूरभाष केंद्राची पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे. हे एवढ्या मोठ्या संख्येतील कॉल्स कुणाकुणाला करण्यात आले, त्याची चाैकशी केली जात असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.
खंडणी वसुलीचा गुन्हा
फोनवरून बाहेर कॉल्स करून गुन्हेगारांची टोळी बाहेरून खंडणी वसूल करीत होती. खापरखेड्यातील एकाला त्यांनी अशाच प्रकारे कारागृहातून फोन करून खंडणीसाठी धमकावल्याचे उजेडात आले आहे. या संबंधाने दुसरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आल्याचेही अमितेशकुमार यांनी लोकमतला सांगितले.