लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एलआयसीचे भागभांडवल विकू नका, विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीत वाढ त्वरित थांबवा, सुधारित पगारवाढ तत्काळ करा, लेबर कोड बिल त्वरित रद्द करा, विमा कायदा १९५६ मध्ये सुधारणा करू नका आदी प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळातील सर्व कर्मचारी व अधिकारी संघटनांनी पुकारलेला देशव्यापी संप नागपुरात यशस्वी झाला.
नागपूर शहरातील सर्वच कार्यालये या संपामुळे ओस पडली होती. कर्मचारी आणि अधिकारी कार्यालयाकडे न फिरकल्याने कार्यालये उघडी असली तरी कामकाज ठप्प पडले. यामुळे हा संप शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा संपकर्त्या संघटनांनी केला आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळ विभागीय कार्यालय नागपूर व २८ शाखा कार्यालयातील १,४०० पेक्षा जास्त कर्मचारी संपावर गेल्याने रोखीच्या व्यवहारासह सर्व सेवा ठप्प पडली होती. संघटनांच्या प्रतिनिधींनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या नियमाचे पालन करून द्वारसभा व निदर्शने केली नाही. बहुतेक कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर आणि प्रांगणात संपात सहभागी होण्याची आवाहन करणारी आणि मागण्यांची पत्रके लावलेली दिसली. या संपात जाॅईंट फ्रंटच्या नेतृत्वातील भारतीय आयुर्विमा महामंडळातील प्रमुख संघटना अ.भा.विमा कर्मचारी असोसिएशन, नॅशनल फेडरेशन ऑफ इन्शुरन्स फिल्ड वर्कर्स ऑफ इंडिया, फेडरेशन ऑफ एलआयसी क्लास वन ऑफिसर्स असोसिएशन, ऑल इंडिया एलआयसी एम्प्लॉइज फेडरेशन व इतर सर्व संघटनांनी या देशव्यापी संपात सक्रिय सहभाग दर्शविला.