लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या कोविड-१९ चा प्रादुर्भाव दुसऱ्या टप्प्यात फार मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत निर्बंध जिल्ह्यात लागू केले आहेत. अप्पर कामगार आयुक्त कार्यालयामार्फत जिल्ह्यात ७४ बांधकामाच्या ठिकाणी १३,८५७ बांधकाम कामगारांना मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत या सर्व कामगारांना दररोज दुपारचे व रात्रीचे भोजन वेळेवर प्राप्त होते की नाही, यासाठी कामगार आयुक्त कार्यालयामार्फत बांधकाम स्थळावर प्रत्यक्ष भेट देऊन शहानिशा करण्यात येते. कोविड काळात मंडळाकडे नोंद असलेल्या बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये अडचणीतील कामगारांना मंडळाच्या वतीने थेट बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आले. नागपूर कार्यालयाकडून एकूण ६७,९५६ नोंदीत व सक्रिय बांधकाम कामगारांची यादी बँक तपशिलासह मंडळाच्या मुख्य कार्यालयाला पाठविण्यात आली आहे. मुख्य कार्यालयांतर्गत त्यांच्या स्तरावरून बांधकाम कामगारांच्या थेट बँक खात्यामध्ये ते पाठविण्यात आले आहे.
कामगारवर्गाच्या हितासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात. जिल्ह्यात एप्रिल २०२१ अखेरपर्यंत एकूण १ लाख ३५ हजार बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी एकूण ३,८०९ कामगारांची नोंदणी सक्रिय आहे. दुसऱ्या टप्प्यातील वाढत असलेला संसर्ग पाहता, या कालावधीत जिल्ह्यात ६७,९५६ बांधकाम कामगारांपैकी ३५,१९० कामगारांच्या थेट बँक खात्यात १५०० रुपये अर्थसहाय्याचे वाटप करण्यात आले आहे.
मंडळातर्फे विविध योजनेंतर्गतही मदत
मंडळातर्फे बांधकाम कामगारांसाठी विविध योजनेंतर्गतही अर्थसहाय्य करण्यात आले आहे. उपयुक्त आवश्यक असलेली अवजारे खरेदी करण्याकरिता पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. त्यामध्ये आजपर्यंत ४४,७८४ लाभार्थ्यांना २२ कोटी ३९ लक्ष २० हजार रुपये इतक्या निधीचे वाटप करण्यात आले आहे. तर विविध कल्याणकारी योजनेंतर्गत आजपर्यत ८,५०० नोंदीत लाभार्थी कामगारांना ३१ कोटी २६ लक्ष ९१ हजार ७५५ इतका निधी वाटप करण्यात आला आहे. तर ७७,३६२ नोंदीत कामगारांना अत्यावश्यक संच व सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले आहे.