बस स्थानकांचा लूक बदलणार नागपूर : जिल्ह्यातील एस.टी. महामंडळाच्या बस स्थानकाच्या व्यवस्थेसंदर्भात बोलताना पालकमंत्री म्हणाले, मौदा व कामठी बस स्थानकाचे बांधकाम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावे, त्यासोबतच नरखेड, हिंगणा, पारशिवनी, मौदा आदी बसस्थानकाच्या बांधकामाचे प्रस्तावही तयार करून येत्या आठवड्यात सादर करण्याची सूचना करताना महादुला व मौदा येथील बसस्थानकांसाठी प्रत्येकी दीड कोटी व इतर बसस्थानकांसाठी प्रत्येकी एक कोटी याप्रमाणे दहा कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर १४४ बस स्थानके असून प्रवासांसाठी शेडसह आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी परिवहन मंत्र्यांसोबत बैठक घेऊन आवश्यक निधी उपलब्ध दिला जाईल. जिल्ह्यात २३ बसस्थानके असून या संपूर्ण परिसराचा विकास करताना प्रवाशांना आधुनिक सुविधांसोबतच खासगीकरणाच्या माध्यमातून व्यापारी संकुलही निर्माण करून जिल्ह्यातील सर्व बसस्थानके एकाच वेळी सुसज्ज करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.मोरभवन येथील बसस्थानकाच्या विकासासोबतच बसपोर्ट म्हणून विकास करण्यासाठी आवश्यक आराखडे तयार करण्याच्या सूचना करताना येथे संयुक्त भागीदाराच्या तत्त्वानुसार विकास करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.मोरभवन येथे शहर बस वाहतुकीसाठी बसथांबा व पार्किंगच्या सुविधा निर्माण करताना नागपूर महानगरपालिकेसोबत करार करून निश्चित झालेल्या भाडेतत्त्वानुसार संयुक्त बैठक घेऊन निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.महापौर प्रवीण दटके यांनी शहर बस वाहतुकीच्या बसेससाठी थांबा व पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिल्यास रस्त्यावर बसेसचे पार्किंग न करता निर्धारित केलेल्या जागेवर बसेसचे पार्किंग करण्यात येईल.यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी मनीषा जायभाय, तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
राष्ट्रीय महामार्गावर १४४ बसथांबे बांधणार
By admin | Published: October 22, 2016 2:39 AM