लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - सीआरआयएफअंतर्गत (सेंट्रल रोड ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंड) नागपूर जिल्ह्यातील १४५ कोटींहून अधिकच्या रस्ते व त्यांच्याशी निगडित कामांना मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. या मंजुरीमुळे जिल्ह्यातील अनेक प्रलंबित मार्गांवर कामे सुरू होणार आहेत.
नागपूर शहरातील अंतर्गत एसएच-३४० या रिंग रोडवरील दोन्ही बाजूंना भिंतीसह लहान पूल बांधण्यासाठी ३ कोटी ८८ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे, तर यशोधरा नगर येथे कळमना उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस मार्गाच्या बांधकामासाठी ४ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सीआरपीएफ गेट-लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन-लता मंगेशकर हॉस्पिटल, शिवणगाव सीमा या पाच किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या विकासासाठी २४ कोटी ७९ लाख रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली गेली आहे. नरसाळा गारगोटी-दिघोरी-खरबी-जिजामाता नगर-तरोडी-नवीन नगर-कापसी मार्गाचे सिमेंटीकरण व त्याला एसएच-३४५ ला जोडण्यासाठी २५.६६ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.
मंजुरी मिळालेली जिल्ह्यातील इतर कामे...
- काटोलमधील विश्रामगृह ते मटण मार्केट मार्गाचा विकास व रुंदीकरण (४.९५ कोटी)
- वाग-विरखंडी-तारणा मार्गावर लहान व मोठ्या पुलाचे बांधकाम (११.०२ कोटी)
- थातुरवाडा-बेलभिष्णूर-तिनखेडा-खरसोली-नरखेड-मोहंदी दळवी- मध्य प्रदेश सीमा या मार्गाचा विकास (३.९५ कोटी)
- रामटेकमधील छत्रपूर-खुमारी-भोंडेवाडा-भंडारबोडी-अरोली मार्गाचे बांधकाम (४.९५ कोटी)
- उमरेडमधील बेला-ठाणा मार्गाचा विकास (२४.९८ कोटी)
- नरखेडमधील खरसोली गावाजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम (७.०२ कोटी)
- पारशिवनीतील घाटोहना-जुनी कामठी मार्गावर मोठ्या पुलाचे बांधकाम (२९.७४ कोटी)