राजीव सिंह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी होम आयसोलेशनची सुविधा सुरू झाल्यापासून शहरातील कोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये शुकशुकाट आहे. दिवाळीनंतर संक्रमित रुग्णांची संख्या वाढली. त्यात रेल्वे स्टेशन व विमानतळावर चार राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग सुरू करण्यात आल्यापासून काॅन्टॅक्ट ट्रेसिंगवर जोर दिला जात आहे. त्यानतरही कोविड केअर सेंटरमध्ये राहण्यासाठी कुणीही तयार नाही. येथे एकूण १४६० बेड असून सध्या येथे फक्त ९८ रुग्ण आहेत. गांधीबाग येथील एकमेव हॉटेलमध्ये कोविड रुग्णांसाठी २३ बेड आरक्षित आहेत. परंतु ते खाली आहेत. नोव्हेंबर महिन्यात झोनच्या सहायक आयुक्तांना काॅन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवून सीसीसी मध्ये रुग्णांना आणण्याचे लक्ष दिले होते. परंतु यात यश आले नाही.
कोविडची दुसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता मनपा प्रशासन कोविड केअर सेंटर बंद करण्याच्या विचारात नाही. सध्या रुग्ण नसल्याने सुरू नाहीत. परंतु गरज पडताच ती सुरू केली जाणार आहेत. सध्या पाचपावली केंद्रावर ९८ संदिग्ध रुग्ण ठेवण्यात आले आहेत.
...
हॉटेलमध्येही सीसीसी
सप्टँबर महिन्यातील रुग्णांची संख्या विचारात घेता एका हॉटेलला कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतरित करण्यात आले. परंतु आता येथे रुग्ण नाही. तसेही आता हॉटेल सुरू झाल्याने ते कोविड रुग्णांना ठेवण्याच्या विचारात नाही. आधी हॉटेल ओरिएन्ट ग्रॅण्ड, हॉटेल ओरिएन्ट क्लासिक, हॉटेल ओरिएन्ट एव्हेन्यू, हॉटेल शिवालिक इन, हॉटेल टाऊनहाऊस, हॉटेल राजधानी येथे कोविड केअर सेंटर केले होते. परंतु आता येथे एकही रुग्ण नाही.