लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका दिला आहे. नागपूर विभागातील १ लाख ८९ हजार १९८ हेक्टरवरील पीक पाण्यात गेले आहे. शासनाने १५ नोव्हेंंबरपूर्वी पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाईचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने प्रशासनाने झालेल्या नुकसानीपोटी १४८ कोटी २९ लाख १७ हजार रुपयांच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.सुरुवातीला उशिरा आलेल्या मान्सूनमुळे शेतीवर परिणाम झाला. कसेबसे शेतात पीक डोलायला लागले असता, दिवाळीपूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतीतील अख्खे उभे पीक पाण्यात गेले. शासनाकडून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आले. या पंचनाम्याच्या अहवालानुसार नागपूर विभागात १ लाख ८९ हजार १९८ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने एकप्रकारे शेतकऱ्यांचे कं बरडेच मोडले आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या सहा जिल्ह्यात ३ लाख ८१ हजार ४४० शेतकरी बाधित झाले आहे. कापूस आणि सोयाबीन पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका बसला. सोयाबीनच्या शेंगातील दाणे काळे पडले. कापसाची सरकी भिजल्याने कोंब फुटले आहे. धान, ज्वारी, भाजीपाला पिकांनाही पावसाचा फटका बसला.
स्मानी संकटामुळे शेतमालाची प्रत प्रचंड खालावली.संत्रा, मोसंबीच्या बागेतील फळे गळून पडली. गळालेली फळं डागाळली. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले. प्रशासकीय पातळीवरील पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याचा एकत्र अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. कृषी विभागाकडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून १४८ कोटी २९ लक्ष १७ हजार रुपये मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.