लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेच्या ई तिकिटांची काळाबाजारी करणाऱ्या आणि रेल्वे प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या ठिकठिकाणच्या १५ दलालांना रेल्वे सुरक्षा दलाने जेरबंद केले. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकांशी संबंधित दलालांविरुद्ध गेल्या महिनाभरात कारवाईची विशेष मोहिम राबविण्यात आली. त्यातून हे दलाल हाती लागले.
वेगवेगळे फंडे वापरून बनावट कागदपत्रांच्या आधारे दलाल रेल्वेचे ई तिकिट काढतात आणि गरजू प्रवाशांना प्रत्येक तिकिटावर पाचशे ते सातशे रुपये जास्त घेऊन ते विकतात, असा हा गोरखधंदा आहे. मोजक्या सिटस् असल्याने गरजू प्रवाशांना आरक्षित तिकिट मिळत नाही. त्यामुळे तो दलालाकडे वळतो आणि दलाल त्याचा गैरफायदा घेऊन एका प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने वसुली करतो. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात रेल्वे तिकिटांची काळाबाजारी होत असल्याच्या तक्रारी असल्यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरपीएफचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी आपल्या सहकाऱ्यांना दलालांविरुद्ध कारवाईची विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार, जून महिन्यात ठिकठिकाणी छापे घालून १५ दलालांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ई तिकिट काढण्यासाठी वापरण्यात येणारे कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल जप्त करण्यात आले. सोबतच त्यांच्याकडून १५,९३४ रुपयांची नवीन ११ ई तिकिटे आणि यापूर्वी त्यांनी विकलेली ५ लाख, २३ हजार, ७९२ रुपयांची जुनी तिकिटेही जप्त करण्यात आली. या ठिकाणी झाली कारवाई आरपीएफने ज्या ठिकाणी दलालांवर कारवाई केली ते रेल्वे स्थानक आणि दलालांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. ईतवारी - ५ दलाल, मोतीबाग ३ दलाल, छिंदवाडा १ दलाल, डोंगरगड २ दलाल, गोंदिया २ दलाल आणि नैनपूर २ दलाल.कारवाईची ही मोहिम अशीच सुरू राहणार असून, प्रवाशांनी रेल्वेच्या तिकिट काउंटर किंवा संकेतस्थळावरूनच तिकिट खरेदी करावे, असे आवाहन आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी केले आहे.